सहाय्यक पोलीस निरीक्षक राणी पाटील यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग पोलिसांची धडक कारवाई
पाली: वाहतूक नियमांचे उल्लंघन करून दंड थकवणाऱ्या वाहन मालकांना महामार्ग पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र, चिपळूण येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक राणी पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच थकित दंड वसुलीची एक विशेष मोहीम राबवण्यात आली, ज्यात एकाच वाहन मालकाकडून ८८,७०० रुपये इतका मोठा दंड वसूल करण्यात आला आहे.
ज्या वाहन मालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करून दंडाची रक्कम भरली नाही, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान, छैलसिंग परमार (रा. एम.आय.डी.सी. लोटे, लेवा केमिकल कंपनी) यांच्या मालकीच्या तीन व्यावसायिक वाहनांवर (एमएच ०८ एएन ५३३३, एमएच ०८ एएक्स ५३३३ आणि एमएच ०८ एएक्स ७००७) मोटार वाहन अधिनियमाखालील विविध कलमांनुसार मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.
या तिन्ही वाहनांवरील थकित दंडाची एकूण रक्कम ८८,७०० रुपये इतकी होती. पोलिसांनी विशेष लक्ष देऊन ही संपूर्ण रक्कम वसूल केली आहे. यामुळे वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांमध्ये जरब निर्माण झाली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक राणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बळीराम शिंदे, संदीप शिंदे तसेच पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ आव्हाड आणि बाबूराव खोंदल यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
महामार्ग पोलिसांनी या मोहिमेद्वारे स्पष्ट संदेश दिला आहे की, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही आणि थकित दंड कठोरपणे वसूल केला जाईल. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी नियमांचे पालन करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.