राजन लाड / जैतापूर : बुधवारी सकाळी अंदाजे ९ वाजण्याच्या सुमारास साखरी-नाटे येथील हुना मास्तर रोडवर एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना घडली. मत्स्य व्यवसाय शिक्षण घेणाऱ्या 11 वर्षाच्या मुलीवर 9 ते 10 कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सुदैवाने ती बचावली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे तिचा जीव वाचला. मात्र ती घाबरली आहे.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार मत्स्य व्यवसाय शिक्षण घेणारी विद्यार्थिनी कुमारी शाहीन उमीद गडकरी शाळेत जात असताना,नाटे सडा पेठ भागातील लोहार दुकान ते अस्मिता पतपेढी या मार्गावर अचानक ९ ते १० भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तिच्यावर झडप घातली.
कुत्र्यांनी तिला वेढा घालून चावा घेण्याचा प्रयत्न केला. या अचानक हल्ल्यामुळे ती अत्यंत घाबरून धावत सुटली सुदैवाने, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अंगणवाडी सेविका बाणे मॅडम यांनी प्रसंगावधान राखत आपल्या छत्रीचा उपयोग करत कुत्र्यांवर प्रहार केला. त्याच वेळी परिसरातील काही महिलांनी धाव घेत तिला तात्काळ मदत केली आणि तिची कुत्र्यांच्या तावडीतून सुरक्षित सुटका करण्यात आली.
ही घटना केवळ एका विद्यार्थिनीपुरती मर्यादित नसून, संपूर्ण परिसरातील शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि सामान्य जनतेसाठी एक गंभीर इशारा आहे. सध्या साखरी-नाटे परिसरात भटक्या कुत्र्यांचे टोळके रस्त्यांवर बिनधास्त फिरत आहेत, त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुढील उपाययोजना अत्यावश्यक आहेत
पालकांनी आपल्या लहान मुलांना शाळेत पाठवताना शक्यतो त्यांच्या सोबत एक जबाबदार व्यक्ती पाठवावी.
शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी वर्गाने विद्यार्थ्यांच्या ये-जा वेळेस विशेष सतर्कता बाळगावी.स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायतीने तातडीने भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
या पूर्वीही ग्रामपंचायत साखरी-नाटे यांच्याकडे नागरिकांनी अर्ज करून भटक्या कुत्र्यांच्या त्रासाची माहिती दिली होती, मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असे सांगितले जात आहे परिणामी आज अशा धोकादायक घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.
गंभीर घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा, भविष्यातील दुर्घटनांना आळा घालण्यासाठी वेळेवर प्रभावी पावले उचलणे अधिक महत्त्वाचे आहे.
स्थानिक प्रशासनाने ‘प्रिकॉशन’ म्हणून त्वरित उपाययोजना कराव्यात, ही ग्रामस्थांची ठाम मागणी आहे.
राजापूर साखरी-नाटे येथे शाळकरी मुलीवर कुत्र्याचा हल्ला, नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली
