GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याने मच्छीमारीला पुन्हा सुरुवात, मच्छी बाजारात आवक वाढली

Gramin Varta
8 Views

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याने बंद पडलेल्या मासेमारीसाठी नौका आता पुन्हा सज्ज झाल्या आहेत. १ऑगस्ट पासून मासेमारी वरील बंदी उठल्यावर जिल्ह्यातील सर्वच मच्छिमारांनी मासेमारीला सुरुवात केली होती.

मात्र जिल्ह्यात पुन्हा वादळी वा-यासह सुरु झालेल्या पावसामुळे मासेमारीला ब्रेक लागला होता. आता पुन्हा मासेमारी सुरु झाली आहे. मच्छीची आवक वाढण्यास सुरुवात झाली असल्याने खवय्ये खुश झाले आहेत.

कोकण किनारपट्टीवरील तीन महिन्यांच्या मासेमारी बंदीनंतर पुन्हा आता मासेमारीला जोमाने सुरुवात झाली आहे. यातील पारंपरिक मासेमारीला १ ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली होती, मात्र पर्सनेट व फिशिंग ट्रॉलर यांना सप्टेंबरची प्रतीक्षा करावी लागली होती. या महिन्याच्या सुरुवात पासूनच मासेमारीला जोरदार सुरुवात झाली आहे.

राजापुर, रत्नागिरी, गुहागर व दापोली येथील मच्छिमारांनी आपल्या नौका समुद्रात नेवून मासेमारीला सुरुवात केली आहे. मासेमारी सुरु झाल्याने खवय्यांना आता मोठ्या प्रमाणात ताजी मच्छी उपलब्ध होवू लागली आहे. तसेच मच्छी बाजारात माशांची आवक वाढत असल्याने अनेक जातीचा मासा बाजारात दिसू लागला आहे. बंदी काळात चढ्या दराने मिळणारे मासे आता आवाक्यात आल्याने मासे बाजारात लोकांची गर्दी दिसू लागली आहे.

हेही वाचासावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे स्वप्न अधुरेच, कोकणासाठी कायमस्वरूपी गाड्या हव्यात

कोकणातील सर्वच भागांना पावसाचा फटका बसला होता. मागील महिनाभर समुद्राला उधाण, प्रचंड लाटा, पाऊस व वारा अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना मच्छीमारांना करावा लागत होता. मात्र आता नवा हंगाम सुरू झाल्याने समुद्रातील करंट, वाऱ्याचा वेग आणि वातावरणाचा अंदाज घेऊन मच्छीमार समुद्रात उतरण्यास सज्ज झाला आहे.

रत्नागिरीतील मिरकरवडा बंदरावर माशांची आवक चांगलीच वाढली आहे. मिरकरवाडा जेटीवर दररोज मच्छी व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. वर्षाला १०० कोटी रुपयांहून अधिक आर्थिक उलाढाल या व्यवसायातून होत असते. नव्या हंगामासाठी खलाशीही मोठ्या संख्येने बंदरावर दाखल झाले असून, बाजारपेठा देखील पुन्हा गजबजू लागल्या आहेत.

Total Visitor Counter

2647182
Share This Article