GRAMIN SEARCH BANNER

राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत देवरूखचे विलास रहाटे प्रथम

Gramin Varta
141 Views

देवरूख : लांजा तालुक्यातील वेरवली येथील श्रीराम विद्यालय व तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय तसेच का. रा. कोळवणकर यामाहा ट्रेनिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री. शैलेश रमेश डोळस विद्यानगरी नामकरण सोहळ्यानिमित्त भव्य राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत देवरूख येथील विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी उत्कृष्ट कलाकृती सादर करत प्रथम क्रमांक पटकावला.

या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ‘पोट्रेट’ हा विषय देण्यात आला होता. भारतीय खेळाडू, चित्रपट व नाट्य कलाकार, शास्त्रज्ञ, चित्रकार, राष्ट्रपुरुष, प्रसिद्ध राजकारणी तसेच देवी-देवता अशा विविध व्यक्तिमत्त्वांपैकी एका विषयाची निवड करण्याचे स्वातंत्र्य स्पर्धकांना देण्यात आले होते. या संधीचा पुरेपूर लाभ घेत विलास रहाटे यांनी जागतिक कीर्तीचे भारतीय शिल्पकार स्व. राम सुतार यांच्या जीवनकार्यावर आधारित ३ बाय ४ फूट आकाराची देखणी रांगोळी साकारली.

सुमारे १२ तासांच्या सातत्यपूर्ण मेहनतीतून पूर्ण केलेल्या या रांगोळीत ‘भारताचे लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा स्व. राम सुतार यांनी घडविलेला जगप्रसिद्ध पुतळा तसेच स्व. राम सुतार यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या तीन प्रभावी छबी अत्यंत बारकाईने रेखाटण्यात आल्या होत्या. या कलाकृतीने परीक्षकांसह उपस्थितांची विशेष दाद मिळवली.

प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल विलास रहाटे यांना आयोजकांच्या वतीने रोख रक्कम ११ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. रांगोळी कलेत सातत्याने मिळवलेल्या यशामुळे विलास रहाटे यांच्यावर रत्नागिरी जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Total Visitor Counter

3369882
Share This Article