रत्नागिरी: सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर पावले उचलली आहेत. मिठाई विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनी अन्नपदार्थ पॅक करण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर पूर्णपणे टाळावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त नि. दि. मोहिते यांनी केले आहे. तसेच, ग्राहकांना खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेविषयी कोणतीही तक्रार असल्यास 1800-222365 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
सणासुदीच्या दिवसांत मिठाई, खवा, मावा, तूप, रवा, मैदा आणि खाद्यतेलाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे मिठाई उत्पादकांनी व विक्रेत्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मिठाई तयार करताना फक्त ‘फूडग्रेड’ रंगाचा आणि तोही अत्यल्प प्रमाणात वापर करावा. तयार केलेले अन्नपदार्थ स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावेत. अन्नपदार्थ हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी डोक्यावर टोपी, मास्क, हातमोजे आणि स्वच्छ ॲप्रन वापरणे बंधनकारक आहे. याव्यतिरिक्त, मिठाईवर वापरला जाणारा चांदीचा वर्ख उच्च प्रतीचा असावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत. बंगाली मिठाई 24 तासांच्या आत खाऊन टाकावी, याबाबत ग्राहकांना स्पष्टपणे सांगावे.
व्यवसायिकांनी आपली आस्थापने स्वच्छ ठेवावीत आणि परिसर किटकांपासून सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी. तसेच, कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करून त्याचा रेकॉर्ड ठेवावा. खाद्यपदार्थांमुळे विषबाधासारखी कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी सर्व मिठाई उत्पादक आणि हॉटेल व्यावसायिकांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मोहिते यांनी केले आहे.