संगमेश्वर (प्रतिनिधी): देवरुख-संगमेश्वर-कोल्हापूर या मुख्य रस्त्यावर संगमेश्वर परिसरात रविवारी दुपारी सुमारे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास लोवले येथे एक झाड रस्त्यावर कोसळले. यामुळे काही काळ वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला. झाड कोसळल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनचालक आणि प्रवाशांना काही काळ गैरसोयीचा सामना करावा लागला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि स्वतः पुढाकार घेत रस्त्यावर कोसळलेले झाड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. ग्रामस्थांनी केलेल्या या तात्काळ मदतीमुळे वाहतूक लवकरच पूर्ववत झाली आणि अनेकांना दिलासा मिळाला. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, या रस्त्याच्या कडेला अनेक जुनाट आणि डळमळीत झाडे असून, ती कधीही कोसळून अपघात होण्याची किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, रस्त्याच्या साइडपट्ट्यांची स्थितीही अत्यंत धोकादायक बनली आहे. या गंभीर बाबींकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने धोकादायक झाडांची पाहणी करून ती कापण्याची तसेच रस्त्याच्या बाजूचे बांधकाम आणि दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील आणि प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करता येईल.