राजापूर: जोपर्यंत हिंदू समाज संघटित होत नाही, तोपर्यंत राजापूर येथील सूर्यमंदिरासारखे प्रश्न सुटणार नाहीत, असे परखड मत हिंदू धर्मयोध्दा आणि अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी राजापूर येथे आयोजित धर्मसभेमध्ये व्यक्त केले. सूर्यमंदिराला कायदेशीररित्या ताब्यात घेण्यासाठी हिंदू उत्सव सुरू करण्याची गरज असून, त्याची सुरुवात येत्या गणेशोत्सवापासून करावी, असे आवाहन त्यांनी केले.
राजापूर येथील सूर्यमंदिराचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी शुक्रवारी (दिनांक २२/०८/२०२५) राजापूरमधील आंबेडकर भवन सभागृहात या धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मुख्य वक्ते म्हणून बोलताना आमदार जगताप यांनी, “प्रत्येक वेळी हिंदूंना त्यांच्या हक्कांसाठी लढा उभारावा लागत आहे. आपल्या देशात हिंदूंचे स्थान काय आहे, हे यावरून लक्षात येते. ही वेळ आपल्यावर आली कारण आपण संघटित नाही. आपल्यातील संकुचितपणा बाजूला ठेवून आपण एकत्रित आले पाहिजे,” असे प्रतिपादन केले.
यावेळी, व्यासपीठावर त्यांच्यासोबत धर्मयोध्दा सागरभैय्या बेग उपस्थित होते. या धर्मसभेमध्ये राज्याच्या विधानसभा अधिवेशनात राजापूर येथील सूर्यमंदिराच्या लक्षवेधीवेळी “राजापूरात सूर्य मंदिरच नाही” असा उल्लेख करणाऱ्या पालकमंत्र्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
पुढे बोलताना आमदार जगताप यांनी, “राजापूर येथील सूर्यमंदिराचा लढा हा केवळ राजापूरचा नसून, तो राज्य आणि देशाचा आहे. सन १९४७ साली झालेली पाकिस्तानची निर्मिती ही आपली मोठी घोडचूक होती.” असे सांगत त्यांनी प्रत्येक घरात धार्मिक विचार पोचवण्याचे आवाहन केले. “भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे येईल. ॲक्शनला रिॲक्शन येईल, मात्र इथे न घाबरता त्याला परतवून लावा. धर्माचे रक्षण करण्यासाठी तुम्ही पाण्याची बाजी लावा, त्याला आमचा नक्कीच पाठिंबा असेल आणि आम्ही केव्हाही तिथे धावून येऊ,” असे आश्वासन त्यांनी दिले.
याचवेळी सागरभैय्या बेग यांनी देशातील संत-महंतांनी ‘सनातन बोर्ड’ची स्थापना करावी, अशी मागणी केल्याची माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, “सन १९९१ साली काँग्रेसने केलेल्या कायद्यांमुळे आज अल्पसंख्याक आपल्याला वरचढ ठरत आहेत. यामुळे हे कायदे रद्द केले पाहिजेत. देशात मुस्लिम लोकसंख्या २५ टक्के असतानाही ‘आम्ही अल्पसंख्याक आहोत’ असे सांगून सर्व योजनांचा लाभ घेत आहेत. यावरून हिंदू अजूनही जागृत नाहीत हे सिद्ध होते. समोरील व्यक्तीला हा देश १९९० चा नाही तर २०२५ चा आहे, हे दाखवून द्या.”
सागरभैय्या बेग यांनी दररोज १,५०० कुटुंबे धर्मांतर करत असल्याची भीती व्यक्त केली. “असे जर घडत राहिले, तर देश कधीच हिंदू राष्ट्र होणार नाही,” असेही त्यांनी सांगितले. “देशात ८० टक्के हिंदू असतानाही हिंदूवर अन्याय का होतो? तर आपण गप्प आहोत. किती दिवस गप्प बसणार?” असा प्रश्न विचारत त्यांनी हिंदूंना अन्यायाविरोधात पेटून उठण्याचे आवाहन केले.
“प्रसंगी अंगावर केसेस घ्या, आम्ही तुमच्या घरापर्यंत येऊन तुम्हाला पाठिंबा देऊ,” अशी ग्वाही त्यांनी दिली. या हिंदू धर्मसभेला तालुक्यातून हजारो हिंदू बांधवांनी लक्षणीय उपस्थिती दर्शविली. यावेळी ‘जय श्रीराम’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते.