GRAMIN SEARCH BANNER

राज्य पोलीस दलात 15,631 पदे भरतीकरीता शासन निर्णय जारी

मुंबई: महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई, तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 15,631 पदे भरतीकरीता शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार पोलीस शिपाई : 12,399, पोलीस शिपाई चालक : 234, बॅण्डसमन : 25, सशस्त्र पोलीस शिपाई : 2,393 आणि कारागृह शिपाई : 580, अशा एकूण 15,631 पदांचा समावेश आहे.
या भरती प्रकियेसाठीही या पूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.450/- व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.350/- इतके परीक्षा शुल्क आकारण्यास तसेच परीक्षा शुल्क स्वरुपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरीता खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

शासन निर्णयात म्हटले आहे की, दि. 1 जानेवारी 2024 ते दि. 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रिक्त झालेली आणि शासन निर्णय क्रमांक – पोलीस-1125/प्र.क.173/पोल-5अ, दिनांक 20 ऑगस्ट, 2025 दि. 01 जानेवारी ते दि 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त होणाऱ्या अपेक्षित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. शासनाने भरती नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली आहे, जसे की वयोमर्यादेत सूट आणि ओएमआर आधारित परीक्षांचा यात समावेश आहे.

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र यांच्यावर संपूर्ण भरती प्रक्रियेची पारदर्शकता आणि देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही आक्षेप, विवाद, न्यायालयीन प्रकरणे किंवा विधायी बाबींसाठी पोलीस महासंचालक जबाबदार असतील. भरती प्रक्रियेसंबंधी शासन निर्णय महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पोलीस महासंचालकांनी पोलीस युनिट्सना परीक्षा प्रक्रियेसंबंधी तपशीलवार सूचना जारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Total Visitor Counter

2474935
Share This Article