रत्नागिरी: येथील फिनोलेक्स ऍकॅडमीमधून वर्षभरात बाहेर पडलेल्या ३०१ विद्यार्थ्यांना उद्योगविश्वातील नामवंत कंपन्यांकडून प्लेसमेंटमधून नोकरीची संधी मिळाली आहे.
अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर मिळणाऱ्या नोकरीच्या संधी हा कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेताना सर्वांत महत्त्वाचा घटक असतो.
अभ्यासक्रमासाठी ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आहे, तेथून मिळणाऱ्या नोकरीच्या संधी अतिशय महत्त्वाच्या ठरतात. त्याला कॅम्पस प्लेसमेंट म्हटले जाते. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच प्लेसमेंटच्या अनेकोत्तम संधी उपलब्ध करून देण्यामध्ये रत्नागिरीतील फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी कोकणामध्ये नेहमीच अग्रेसर राहिली आहे.
फिनोलेक्स ऍकॅडमी अभियांत्रिकी महाविद्यालयाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्लेसमेंट ड्राइव्हमधून ३०१ विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. टी सी एस ( टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) कॅपजेमिनी, सीमेन्स, रिलायन्स, महिंद्रा सोलराइझ, स्नायडर इलेक्ट्रिक, विप्रो पारी, इलेक्ट्रोमेक, विनती ऑर्गॅनिकस, टेक्निमोंट, मरीन इलेक्ट्रिकल्स, सिक्लम, क्यू स्पायडर, रोश पॉलिमर, मॅक्सवेल, बेंचमार्क अशा एकूण ५२ नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली आहे. मागील चार वर्षांमध्ये फिनोलेक्स ऍकॅडमीने सुमारे १२०० विद्यार्थ्यांना १०० हून अधिक नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. शिक्षण घेतानाच अधिकाधिक विद्यार्थ्यांना नोकरीची संधी प्राप्त करून देण्यासाठी फिनोलेक्स अॅकॅडमी नेहमीच कटिबद्ध असते. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून पहिल्या सेमिस्टरपासून त्यांच्यावर मेहनत घेतली जाते. त्यादृष्टीने वर्षभर विद्यार्थ्यांकडून रोजगार कौशल्याचा विकास व्हावा म्हणून कसून सराव करून घेतला जातो. त्याचाच भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी विविध ट्रेनिंग प्रोग्रॅमचे आयोजन केले जाते. त्यामध्ये बार्कलेज व ग्लोबल टॅलेंट ट्रॅक यांच्याशी भागीदारीत ‘लाइफ स्किल्स’ प्रोग्रॅम, ॲप-टेकमार्फत अॅप्टिट्यूड ट्रेनिंग, ‘कोड फ्युजन’ प्रोग्रॅमिंग सिरीज, प्रोजेक्ट मॅनेजमेंट वर्कशॉप, कंपनी स्पेसिफिक ट्रेनिंग आणि मॉक इंटरव्ह्यू सत्रे असे अनेक उपक्रम समाविष्ट आहेत. विद्यार्थ्यांना विविध नामांकित उद्योगांमध्ये इंटर्नशिप्स करण्याची संधीदेखील दिली जाते. या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे तांत्रिक कौशल्य, संवादक्षमता आणि कॉर्पोरेट तयारी अधिक बळकट होते. त्यामुळे ते विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरत आहेत.
रत्नागिरी : वर्षभरात फिनोलेक्स ऍकॅडमीच्या ३०१ विद्यार्थ्यांना नोकरी
