GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: अखेर वैभव खेडेकर यांचा भाजप पक्ष प्रवेश संपन्न

Gramin Varta
496 Views

मुंबई: गेले काही दिवस रखडलेला आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला मनसेचे माजी नेते वैभव खेडेकर यांचा भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश अखेर आज संपन्न झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत खेडेकर यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. मनसेतून हकालपट्टी झाल्यावर खेडेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा बोलून दाखवली होती, मात्र, काही कारणास्तव तब्बल तीन वेळा हा पक्षप्रवेश रद्द झाला होता. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

कोकणातील खेड नगर परिषदेवर मनसेचे नगराध्यक्ष म्हणून प्रभावीपणे काम केलेले आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या विरोधात आवाज उठवणारे नेते म्हणून वैभव खेडेकर यांची ओळख आहे. मनसेच्या पक्षविरोधी कारवायांच्या आरोपावरून पक्षाने त्यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी तत्काळ भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले होते. मात्र, पक्षप्रवेशाची तारीख निश्चित झाल्यावरही वेगवेगळ्या कारणांनी हा सोहळा वारंवार पुढे ढकलला गेला. यामुळे खेडेकर यांच्या राजकीय भवितव्याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.

आज मात्र अखेर शुभ मुहूर्त जुळला आणि खेडेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. या प्रवेशामुळे कोकणातील भाजपच्या संघटनात्मक बळाला आणखी धार मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मनसेमध्ये असताना त्यांनी कोकणात पक्षाचे काम मजबूत केले होते, आता तीच ताकद ते भाजपसाठी वापरणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वैभव खेडेकर यांच्या भाजप प्रवेशामुळे कोकणातील राजकारणावर त्याचे काय परिणाम होतात, याकडे आता राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. भाजप त्यांना नेमकी कोणती जबाबदारी देते, हे देखील लवकरच स्पष्ट होईल.

Total Visitor Counter

3200134
Share This Article