GRAMIN SEARCH BANNER

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनी राजापूर पोलिसांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष; अमृत तांबडेंचा सरकारला थेट सवाल

Gramin Varta
17 Views

राजापूर : २ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस साजरा होत असताना राजापूर पोलीस यंत्रणेच्या मूलभूत प्रश्नांकडे मात्र शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप समाजसेवक अमृत अनंत तांबडे यांनी केला आहे. राजापूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे दीर्घकाळापासून बंद अवस्थेत असून अशा परिस्थितीत पोलिसांनी तपास कसा करायचा, असा थेट सवाल त्यांनी सरकारला केला आहे.

राजापूर पोलीस ठाणे अद्याप स्वतःच्या इमारतीत कधी स्थलांतरित होणार, पोलीस निरीक्षकांचा बंगला कधी उभारला जाणार, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पोलीस लाईन किंवा विश्रांतीसाठी घरे का उपलब्ध नाहीत, असे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याकडे तांबडे यांनी लक्ष वेधले. सध्या अनेक पोलीस कर्मचारी भाड्याच्या घरात राहत असून पगाराचा मोठा हिस्सा घरभाडे व मेसच्या जेवणावर खर्च होत आहे. त्यांनाही कुटुंब, पत्नी, मुले आणि त्यांच्या शिक्षणाच्या जबाबदाऱ्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जे पोलीस बांधव नागरिकांची रात्रंदिवस काळजी घेतात, त्यांच्या अडचणींचा विचार मात्र कोणीही करत नसल्याची खंत तांबडे यांनी व्यक्त केली. राजापूर पोलीस यंत्रणा सध्या पूर्णपणे दुर्लक्षित अवस्थेत असून शासनाने याकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण आझाद मैदानात पाच वेळा उपोषण आंदोलन केल्याची माहिती देत, तरीही शासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. शेवटी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त सर्व पोलीस बांधवांना शुभेच्छा देत, राजापूर पोलिसांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची विनंती अमृत तांबडे यांनी केली.

Total Visitor Counter

3367002
Share This Article