हैदराबाद : महिलांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाकडून मोठमोठे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात महिलांना सार्वजनिक ठिकाणी किती असुरक्षित वातावरणाचा सामना करावा लागतो, याचे धक्कादायक वास्तव हैदराबादमध्ये समोर आले आहे. मलकाजगिरीच्या पोलीस आयुक्त सुमती यांनी स्वतः साध्या वेशात मध्यरात्री रस्त्यावर उभे राहून केलेल्या एका गुप्त मोहिमेत अवघ्या तीन तासांत तब्बल ४० तरुणांनी त्यांच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
नुकताच पदभार स्वीकारलेल्या आयुक्त सुमती यांनी शहरातील महिलांच्या सुरक्षेची खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी हा अनोखा प्रयोग राबवला. मध्यरात्री १२.३० ते पहाटे ३.३० या वेळेत त्या कोणताही पोलीस बंदोबस्त किंवा सुरक्षा न ठेवता एका बसस्थानकावर सामान्य महिलेसारख्या उभ्या राहिल्या. या काळात विविध वयोगटातील सुमारे ४० पुरुषांनी त्यांच्याशी संवाद साधण्याच्या बहाण्याने छेडछाड व गैरवर्तनाचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे, या तरुणांमध्ये केवळ गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक नव्हते, तर विद्यार्थी, सुशिक्षित युवक आणि नामांकित कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. अनेक जण दारूच्या नशेत असल्याचे दिसून आले, तर काहींनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. समोर उभी असलेली महिला ही शहराची वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे, याची कल्पना कोणालाही नव्हती.
या संपूर्ण मोहिमेनंतर पोलिसांनी संबंधित सर्व तरुणांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतले. मात्र, तातडीने गुन्हे दाखल करण्याऐवजी पोलिसांनी समुपदेशनाचा मार्ग स्वीकारला. संबंधितांना त्यांच्या कुटुंबीयांसमोर बोलावून महिलांशी सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे, याबाबत कडक शब्दांत समज देण्यात आली. भविष्यात अशी कृत्ये पुन्हा आढळल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला.
आयुक्त सुमती यांच्यासाठी अशा प्रकारची मोहिम नवी नाही. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातही त्यांनी काझीपेट रेल्वे स्थानक परिसरात अशाच प्रकारे अंडरकव्हर राहून महिलांच्या सुरक्षेचा आढावा घेतला होता. तेलंगणा केडरच्या या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी यापूर्वी राज्य गुप्तचर विभागात काम करताना तसेच माओवाद्यांच्या आत्मसमर्पण मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
या धाडसी मोहिमेनंतर मलकाजगिरी परिसरातील महिलांकडून आयुक्त सुमती यांच्या कार्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. “अशा अधिकाऱ्यांमुळेच महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक राहतो,” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. समाज माध्यमांवरही या मोहिमेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून, नागरिकांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
मध्यरात्रीच्या सापळ्यात उघड झालं महिलांच्या सुरक्षेचं भयावह वास्तव; ‘लेडी सिंघम’समोर ३ तासांत ४० तरुणांची गैरवर्तणूक





