चिपळूण: गेल्या २४ तासांपासून चिपळूण तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वशिष्ठी नदीची पाणी पातळी पुन्हा एकदा वाढली आहे. आज सकाळी ७ वाजता नदीची पातळी ५ मीटर म्हणजेच इशारा पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या २४ तासांत कोळकेवाडी धरण परिसरात विक्रमी २०५ मिमी पावसाची नोंद झाली असून, धरणाची पाणी पातळी १३२.९५ मीटरवर गेली आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून धरणातील सर्व यंत्रणा बंद करण्यात आल्या आहेत.
सकाळी ९:५० वाजता भरतीची वेळ असल्याने पुढील ३ तास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. भरतीमुळे नदीची पाणी पातळी आणखी वाढू शकते. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी नगरपालिका, महसूल, पोलीस आणि एनडीआरएफची (NDRF) पथके ११ ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. तसेच, मदतकार्यासाठी ५ ठिकाणी बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून, नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.