मुंबई: अभिनेत्री तेजस्विनी पंडितवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. तेजस्विनी पंडित हिची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी निधन झालंय.
दीर्घकाळ आजाराशी झुंज देत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. ज्योती चांदेकर यांनी त्यांच्या कारकीर्दीत स्टार प्रवाह वरील ‘ठरलं तर मग’ ही शेवटची मालिका केली आहे. यापूर्वी देखील त्यांनी अनेक मालिकांमध्ये आणि सिनेमांमध्ये काम केलं होतं. ज्योती चांदेकर यांनी अनेक मालिका, नाटक आणि सिनेमात भूमिका निभावल्या होत्या. त्यांनी साकारलेली मी सिंधुताई सपकाळ या सिनेमातील सिंधुताईंची भूमिका चांगलीच गाजली.
ज्योती चांदेकर या मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या खास अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांची मुलगी तेजस्विनी पंडित ही देखील एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. आई-मुलगी या जोडगोळीने 2015 मध्ये Dipti Ghonsikar यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘तिचा उंबरठा’ या पुरस्कारप्राप्त चित्रपटात काम केले. या चित्रपटात ज्योती यांनी तेजस्विनीच्या सासूची भूमिका साकारली होती. या दोघींना 2015 च्या झी गौरव पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता.
ज्योती चांदेकर यांनी ‘मी सिंधुताई सपकाळ’ (2010) आणि ‘गुरु’ (2016) या चित्रपटांतही काम केले आहे. त्यांच्या 2017 मधील प्रदर्शित चित्रपटांत मुरली नल्लप्पा दिग्दर्शित ‘देवा एक अतरंगी’ याचा समावेश आहे.
अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं वयाच्या 68 व्या वर्षी निधन, तेजस्विनी पंडितला मातृशोक
