GRAMIN SEARCH BANNER

मिळकत नसताना प्रॉपर्टी कार्ड; रायगडमध्ये ‘स्वामित्व’ योजना वादाच्या भोवऱ्यात

Gramin Varta
4 Views

रायगड: गावठाण क्षेत्रातील नागरिकांना मिळकतींवर कायदेशीर हक्क मिळावा, या हेतूने केंद्र सरकारने सुरू केलेली स्वामित्व योजना सध्या रायगड जिल्ह्यात वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

मिळकत नसतानाही मिळकत पत्रिका वाटप झाल्याचे प्रकार समोर येत असून, काही ठिकाणी सरकारी जमिनीचे मालकी हक्क कागदोपत्री मिळवून त्यांची विक्री करण्याचे प्रकार उघड झाले आहेत.

रायगडमधील खंडाळे ग्रुप ग्रामपंचायतमधील संगमपाडा येथे सरकारी ग्रामपंचायत रस्ता बंद करून, प्रॉपर्टी कार्ड क्र. १२४ अंतर्गत १५ गुंठे जागा परस्पर विकण्यात आल्याची गंभीर तक्रार झाली आहे. यासंदर्भात ग्रामस्थ महेश पेडणेकर व इतरांनी पंचायत समिती, अलिबागकडे तक्रार दिली. चौकशीत शासनाच्या जमिनीवर सिटी सर्वेचा नकाशा तयार करून व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले असून, अनेक असेसमेंट नोंदवलेली घरे प्रत्यक्षात अस्तित्वातच नसल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक यांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त होत असून, संपूर्ण प्रकारात भूमिअभिलेख विभागातील अधिकाऱ्यांच्या सहभागाचीही शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर पंचायत समितीने तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात एकूण १,६३४ गावांपैकी १,५३४ गावांचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले असून, ९०,१७३ लाभार्थ्यांना मिळकत पत्रिका देण्यात आल्या आहेत. मात्र, यामध्ये अनेक चुका झाल्याचे आरोप आहेत. काही लाभार्थ्यांना एकाच कुटुंबासाठी एकाहून अधिक पत्रिका मिळाल्या असून, काही ज्येष्ठ नागरिकांना हक्काच्या घरासाठी कार्यालयांचे फेरे मारावे लागत आहेत.

या सर्व प्रकारामुळे स्वामित्व योजनेवरील विश्वास डळमळीत होत असून, चुकीच्या लाभार्थ्यांना लाभ मिळण्यामागील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

Total Visitor Counter

2645819
Share This Article