लांजा भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा पवित्रा; २ मार्चपासून बेमुदत काम बंदचा इशारा

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

लांजा: भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ आता कर्मचारी आक्रमक झाले असून १८ फेब्रुवारीपासून राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनात लांजा भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारीदेखील सक्रिय सहभाग नोंदवणार असून, मागण्या मान्य न झाल्यास २ मार्चपासून संपूर्ण कामकाज बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीने दिला आहे.

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई आणि नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार तांत्रिक वेतनश्रेणी लागू करणे ही कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे. यासंदर्भात महसूल मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत दीडशे दिवसांच्या कृती कार्यक्रमात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाले होते, मात्र हा कालावधी उलटूनही काहीच कार्यवाही झालेली नाही. शासन स्तरावर केवळ वेळकाढूपणा सुरू असून कर्मचाऱ्यांच्या संविधानिक हक्कांवर गदा आणली जात असल्याचा आरोप संघटनेने पुणे येथील जमाबंदी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे. या आंदोलनांतर्गत १८ फेब्रुवारीला कर्मचारी मोजणी साहित्य जमा करून काळ्या फिती लावून काम करतील, २० फेब्रुवारीपासून मोजणी काम पूर्णपणे बंद ठेवले जाईल, तर २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान सामूहिक रजा आंदोलन पुकारले जाणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी पुणे येथील जमाबंदी आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला जाईल आणि तरीही दखल न घेतल्यास २ मार्चपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले जाईल. लांजा कार्यालयातील शिरस्तेदार देवाशीष सुवरे, भूकरमापक तुषार कदम, परिरक्षण भूमापक काशीनाथ कुमठेकर, शुभम कुरळपकर, शितल कांबळे, संकेत सणस, किर्ती नार्वेकर, सुशिल तळेकर, प्रतिभा कचरे आणि संदीप पोमेंडकर आदी कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *