GRAMIN SEARCH BANNER

खेडशी गयाळवाडी येथील डंपर अपघात प्रकरणी सोलापूरच्या चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी: रत्नागिरी-हातखंबा मार्गावरील खेडशी गयाळवाडी येथे १५ फेब्रुवारी रोजी सकाळी घडलेल्या विचित्र डंपर अपघात प्रकरणी डंपर चालकावर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडुपंत तात्या ठवरे (वय ३५, रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित डंपर चालकाचे नाव आहे. या अपघातात एका कारसह दुचाकी आणि रस्त्याकडेला असलेल्या घराच्या कठड्याचे तसेच विहिरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित चालक बंडुपंत ठवरे याने १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील डंपर (एमएच २५ एजे १६९९) खेडशी गयाळवाडी येथे रस्त्याच्या कडेला उभा केला होता आणि तो चहा पिण्यासाठी गेला होता.

मात्र, डंपरचा ब्रेक व्यवस्थित न लावल्याने उतारावर डंपरचा ताबा सुटला आणि तो वेगाने धावत जाऊन तिथे उभ्या असलेल्या कार व दुचाकीला धडक दिली. इतक्यावरच न थांबता हा डंपर स्थानिक रहिवासी गितेश तांडेल यांच्या घराच्या आवारात घुसून धडकला. या धडकेत तांडेल यांच्या विहिरीचे आणि घराच्या कठड्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3485606
Share This Article