चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण शहराच्या पुरमुक्तीला चालना मिळण्यासाठी याहीवर्षी वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा मोहिम जलसंपदा विभागाकडून सुरू आहे. बाजारपूल येथील गणेशविसर्जन घाट, गोवळकोट व पेठमाप येथे गाळ उपसा केला जात आहे. आतापर्यंत वाशिष्ठी नदीतून ८० हजार घनमिटर गाळ उपसा करण्यात आला असल्याची माहिती जलसपंदा विभागाकडून देण्यात आली.
चिपळूण शहर व परिसरात २०२१ मध्ये आलेल्या महापूरात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तेचे नुकसान झाले होते. त्यानंतर वाशिष्ठी आणि शिवदीतील गाळाचा मुद्दा ऐरवणीवर आला. गाळ उपशाला चालना मिळण्यासाठी नागरिकांच्या साथीने चिपळूण बचाव समितीने महिनाभर आंदोलन छेडले. या साऱ्याचा परिपाक म्हणून महापूरानंतर चिपळूणात गाळ उपशासाठी पहिल्या वर्षी मोठी यंत्रणा कामाला लागली. सुमारे ८ लाख घनमिटर गाळ उपसा झाला. दुसऱ्याही वर्षी गाळ उपशाचे काम जोमाने सुरू राहिले. मात्र गेल्या दोन तिन वर्षात चिपळूणातील यंत्रणा अन्यत्र हलवण्यात आली. परिणामी धिम्या गतीने गाळ उपसा सुरू राहिला. सध्या यांत्रिकी विभागाकडून ५ पोकलेन आणि ११ डंपरच्या साह्याने गाळ उपसा केला जात आहे. शहरातील बाजारपूल येथील गणेशविसर्जन घाट, गोवळकोट आणि पेठमाप येथे गाळ उपशाचे काम सुरू आहे. काढलेला बहुतांशी गाळ हा खासगी जागेत टाकला जात आहे. ज्यांनी महसूल विभागाकडे रॉयल्टी भरली आहे, अशा व्यक्तींच्या जागेत गाळ टाकला जात आहे. यापुर्वी शहर परिसरातील शासकीय जागेत हा गाळ टाकण्यात आला होता. चिपळूणात गेल्या पाच वर्षापासून सातत्याने गाळ काढण्याचे काम सुरू राहिल्याने गतवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन देखील पुराची समस्या जाणवली नव्हती. नलावडा बंधारा उभारण्यात आल्याने शहरात पाणी भरण्याचे प्रमाण कमी झाल्याचे जाणवले होते. त्यामुळे पावसाळा सुरू होइपर्यंत गाळ उपसा मोहिम सुरू राहणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. चौकट- आतापर्यंत वाशिष्ठी नदीतील सुमारे ८० हजार घनमिटर गाळ उपसा करण्यात आला आहे. गणेशविसर्जन घाट, गोवळकोट आणि पेठमाप येथे गाळ उपसा केला जात आहे.







