रत्नागिरी : आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून दर शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या ‘कोकण दर्शन’ या विशेष मालिकेत यावेळी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे आणि तिथल्या सागरी पर्यटनाची सफर घडणार आहे. येत्या १२ जून रोजी सकाळी ८.४० वाजता या माहितीपूर्ण कार्यक्रमाचे प्रसारण केले जाणार आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रोत्यांना श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील विविध उपक्रम, उत्सव, डोंगर प्रदक्षिणा तसेच ग्रामदेवता चंडिका मंदिर याविषयीची रंजक आणि सविस्तर माहिती ऐकायला मिळणार आहे. गणपतीपुळेचा विस्तीर्ण समुद्रकिनारा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतो; मात्र येथे समुद्र स्नानाचा आनंद घेताना पर्यटकांनी कोणती काळजी घ्यावी, याविषयीचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शनही यातून केले जाणार आहे. या विशेष भागात संस्थान श्री गणपतीपुळेचे अध्यक्ष श्री. निलेश कोल्हटकर, स्थानिक महिला आणि भाविक सौ. पद्मजा कुमार जोशी तसेच जीवरक्षक उमेश महाद्ये यांचा सहभाग असणार आहे.
या कार्यक्रमाचे लेखन सौ. सोनाली संदेश सावंत यांनी केले असून, निवेदन व निर्मिती सहाय्य सौ. सोनाली सावंत आणि सौ. वंदना आशिष मुसळे यांचे आहे. कार्यक्रमाचे सादरीकरण विवेक वानखडे करणार आहेत. हा कार्यक्रम मध्यम लहरी ११४३ किलोहर्ट्झ, एफएम वाहिनी १०१.५ मेगाहर्ट्झ आणि ‘NewsOnAir’ या लाईव्ह मोबाईल ॲपवर एकाच वेळी प्रसारित होईल. या व्यतिरिक्त, प्रसारणा नंतर ‘airratnagiri1248’ या युट्यूब चॅनेलवरही श्रोत्यांना हा कार्यक्रम ऐकता येईल. रत्नागिरीतील पर्यटन स्थळांची ओळख करून देणारा हा कार्यक्रम सर्वांनी अवश्य ऐकावा, असे आवाहन आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘कोकण दर्शन’मध्ये १२ जूनला घडणार गणपतीपुळे आणि सागरी पर्यटनाची सफर





