रत्नागिरी: तालुक्यातील जयगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबा बागायतीमध्ये मजुरीचे काम करणाऱ्या एका ६० वर्षीय वृद्धाचा छातीत दुखू लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हरीराम दुल्हारे चव्हाण (रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. रीळ, भंडारवाडा) असे मृत व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी जयगड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत हरीराम चव्हाण हे रीळ येथील अमरनाथ अवधूत चव्हाण यांच्या घरी राहून आंबा बागेत मजुरीचे काम करत होते. ४ मार्च २०२६ रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या छातीत अचानक तीव्र कळा येऊ लागल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घरमालक अमरनाथ चव्हाण यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद खंडाळा येथे नेले.
मात्र, तिथे पोहोचल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.या घटनेची माहिती मिळताच जयगड पोलिसांनी बी.एन.एस.एस. कलम १९४ नुसार आकस्मिक मृत्यूचा गुन्हा रजिस्टर क्रमांक ०९/२०२६ अन्वये दाखल केला आहे. सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास या मृत्यूची अधिकृत नोंद करण्यात आली. आंबा हंगामासाठी परराज्यातून कोकणात आलेल्या मजुराचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मृतदेह शवविच्छेदनानंतर वारसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.






