चिपळूण: अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि अत्याचार प्रकरणातील आरोपी विकास विजय पवार यास चिपळूण येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात फिर्यादी संतोष निकम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने त्यांच्या मुलीस फूस लावून पळवून नेले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप करण्यात आला होता. यावरून आरोपीवर भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
न्यायालयात सुनावणी दरम्यान बचाव पक्षाचे वकील अॅडव्होकेट फारुक म्हातारनाईक यांनी महत्वपूर्ण युक्तिवाद केला. आरोपी आणि पीडिता यांच्यात प्रेमसंबंध होते आणि पीडिता स्वतःच्या इच्छेने आरोपीसोबत गेली होती, असा दावा त्यांनी केला. तसेच फिर्यादीत पीडितेचे वय कमी दाखवण्यात आले असले तरी प्रत्यक्षात वयाबाबत गंभीर विसंगती असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपीचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नसून तो मूळचा पाटण येथील गरीब कुटुंबातील तरुण असल्याचे सांगत, तपास पूर्ण झाल्याने कोठडीची आवश्यकता नसल्याचा मुद्दा बचाव पक्षाने ठामपणे मांडला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आणि आरोपी साक्षीदारांवर दबाव आणणार नाही या हमीवर विकास पवारचा जामीन अर्ज मंजूर केला. या प्रकरणात आरोपीच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट फारुक म्हातारनाईक आणि अॅडव्होकेट वैभव हळदे यांनी काम पाहिले.







