GRAMIN SEARCH BANNER

ऊन-पावसाच्या लपंडावात लांजा तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त; भातशेती कुजण्याची भीती

Gramin Varta
19 Views

लांजा / सिकंदर फरास: परतीच्या पावसाने लांजा तालुक्यात शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी भर टाकली आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे काढणीला आलेली भातशेती शेतातच आडवी झाली आहे, तर अनेक ठिकाणी कापणीची कामे खोळंबली आहेत. तयार झालेले पीक शेतातच राहिल्याने ते कुजण्याची किंवा भाताच्या लोंब्यांमध्ये कोंब फुटण्याची भीती निर्माण झाली असून, यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी वर्षभर मेहनत करून भात पीक जोपासले; मात्र परतीच्या पावसाच्या या अनिश्चिततेमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची वेळ आली आहे. आपले वर्षभराचे कष्ट वाया जाऊ नयेत यासाठी शेतकरी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पावसाने थोडी उसंत घेतल्यास तातडीने भात कापून ते सुरक्षित निवाऱ्यापर्यंत पोहोचवण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. काही भागांमध्ये भात कापणीचे काम मोठ्या गतीने सुरू असल्याचे चित्र दिसत असले, तरी हवामानातील हा ऊन-पावसाचा लपंडाव शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण करत आहे.

पाऊस कधी थांबेल आणि कापणी कधी पूर्ण होईल, या विवंचनेत शेतकरी आहेत. अनेक शेतांमध्ये उभे असलेले भात पीक कापणीसाठी पूर्णपणे तयार आहे, परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे ते तसेच पडून आहे. परतीच्या या अवकाळी पावसामुळे भात शेतीचे मोठे नुकसान झाले असून, उत्पादनावर आणि पिकाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे या नुकसानीची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Total Visitor Counter

3199198
Share This Article