सिंधुदुर्ग: राज्यात आमचे सरकार आहे, आमचे मुख्यमंत्री आहेत, तरी सुद्धा अवघ्या काही महिन्यात केलेला आमच्या गावातील रस्त्याची दुरवस्था होते आणि त्याच्या दुरुस्तीबाबत कोणीच दाद घेत नसल्यामुळे आम्हाला आमच्याच सरकार विरोधात उपोषण करावे लागत आहे यासारखी शरमेची गोष्ट नाही !
या संतप्त भावना आहेत मालवण तालुक्क्यातील आंबेरी गावच्या ग्रामस्थांच्या. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात आलेल्या चव्हाटा-आंबेरी मार्गावर (ग्रा. मा. ४०७) मोठे खड्डे पडून हा रस्ता वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला आहे. याबाबत प्रमंग्रासयोच्या कुडाळ येथील कार्यालयासमोर ग्रामस्थ आज उपोषणाला बसले होते. अखेर चार दिवसात रस्ता दुरुस्त करून देतो असे लेखी पत्र प्रमंग्रासयोचे कार्यकारी अभियंता धनंजय भोसले यांनी ग्रामस्थांना दिल्यावर त्यांनी उपोषण मागे घेतले. पण या पत्राची अंमलबजावणी झाली नाही तर संपूर्ण गावाच्या निर्णयानुसार ग्राम पंचायत सरपंच आणि सगळे सदस्य राजीनामा देणार असल्याचा इशारा सरपंच मनोज डिचोलकर यांनी दिला.
मालवण तालुक्यातील आंबेरी येथील चव्हाटा ते आंबेरी हा (ग्रा.म. ४०७) मार्ग प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात आला. या कामाला अवघे काही महिनेच होत नाहीत तो पर्यंत या मार्गावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. रस्ता वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला आहे. रस्त्यावरून वाहतूक करताना ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. तसेच या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडल्यामुळे मोठा अपघात होण्याची देखील शक्यता आहे. रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे एसटीच्या गाड्या देखील बंद झाल्या होत्या. त्यासाठी सुद्धा ग्रामस्थाना आंदोलन करावे लागले होते. या रस्त्याच्या या दुरवस्थेबाबत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कुडाळ कार्यालयाकडे ग्रामस्थ, सरपंच यांनी वारंवार लेखी तसेच तोंडी तक्रार केली होती. पण या कार्यालयाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सिंधुदुर्ग : आंबेरी ग्रामस्थांचे रस्त्यासाठी उपोषण

Leave a Comment