GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: चिपळुणात TWJ कंपनीने २८ लाखांची फसवणूक; चौघांविरोधात गुन्हा दाखल

Gramin Varta
833 Views

चिपळूण: येथील TWJ असोसिएट्स कंपनीच्या चार प्रतिनिधींनी गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचं आमिष दाखवून एका व्यक्तीची आणि त्यांच्या बहिणीची २८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित व्यक्तीने पोलिसात तक्रार दाखल केली असून, चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना जानेवारी २०२३ पासून आजपर्यंत चिपळूण शहरातील इंटक भवन, पागमळा येथील TWJ असोसिएट्सच्या कार्यालयात घडली. या प्रकरणी प्रतिक दिलीप माटे (वय २९, रा. कामथे, चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी समीर सुभाष नार्वेकर (रा. गुहागर), त्याची पत्नी सी. नेहा समीर नार्वेकर (रा. गुहागर), संकेश रामकृष्ण घाग (रा. चिपळूण) आणि सिद्धेश शिवाजी कदम (रा. कामथे, चिपळूण) या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २१६/२०२५, १८(२), १८(४) आणि १८(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी समीर नार्वेकर आणि त्याची पत्नी सी. नेहा नार्वेकर यांनी त्यांची कंपनी ‘TWJ असोसिएट्स’चे प्रतिनिधी म्हणून संकेश घाग आणि सिद्धेश कदम यांच्यामार्फत प्रतिक माटे यांचा विश्वास संपादन केला. त्यांनी गुंतवणुकीवर दर महिन्याला ३ ते ४ टक्के परतावा देण्याचं मोठं आमिष दाखवलं. या आमिषाला बळी पडून प्रतिक माटे यांनी स्वतः ३ लाख ५० हजार रुपये आणि त्यांची बहीण तृप्ती दिलीप माटे यांनी २५ लाख रुपये, अशी एकूण २८ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक या कंपनीत केली.

जानेवारी २०२३ पासून ते आजपर्यंत ही गुंतवणूक करण्यात आली. मात्र, मे २०२५ नंतर कंपनीने त्यांना कोणताही परतावा दिला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही त्यांची मूळ रक्कमही परत मिळाली नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर प्रतिक माटे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून, पुढील कारवाई केली जाईल. अशाप्रकारे फसवणुकीचे प्रकार वाढले असून नागरिकांनी अशा आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

2647770
Share This Article