GRAMIN SEARCH BANNER

खेड: पुराच्या पाण्यात अडकलेल्या महिलेला तरुणांनी वाचवले

Gramin Varta
4 Views

खेड:  शहरात मंगळवारी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मटन मार्केट परिसर जलमय झाला. या परिसरातील भोसते रोडमार्गे आपल्या दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिला नागरिकाने पुराचे पाणी असूनही मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक वाढलेल्या पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की महिला आणि तिची दुचाकी पुराच्या लाटांमध्ये वाहून जाण्याच्या स्थितीत आली.

ही धोकादायक परिस्थिती ओळखून परिसरातील तीन जागरूक तरुणांनी प्रसंगावधान राखत तत्काळ पाण्यात उडी घेत महिलेचा जीव वाचवला. सरफराज भाऊ पांगारकर, एजाज खेडेकर आणि खालील जुईकर या तिघांनी कोणतीही भीती न बाळगता पुराच्या प्रवाहात उतरून महिलेला बाहेर काढले. या धाडसी कृत्यामुळे आज खेड बाजारपेठेत या तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून मटन मार्केट परिसरातून बाजारपेठेच्या दिशेने पाणी साचत आहे. पावसाची ही स्थिती असाच कायम राहिल्यास शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

स्थानिक प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क राहण्याचे तसेच नागरिकांनी अनावश्यकपणे जलभरलेल्या भागात प्रवेश न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

2647335
Share This Article