धामणी (प्रतिनिधी)
काळाच्या ओघात पारंपरिक रीती रीवाज कला, खेळ, वेशभूषा, खाद्यपदार्थ इ. मागे राहिल्या किंवा दुर्लक्षित झाल्या. मात्र हळूहळू आजची तरूणाई पुन्हा आपल्या परंपरेकडे येऊ पाहत आहे. टिपरी नृत्य ही या वर्षीपासून तग धरून आहे. विविध गावामधून टिपरी नृत्य कला ही सादर करत आहे. पण श्री सोळजाई टिपरी नृत्य , पर्शरामवाडी या समूहाचे वेगळेपण पाहण्यासाठी प्रेक्षक विशेष गर्दी करत असतात.
या समुहामध्ये खास आकर्षण ठरतेय अवघे सात वर्षीय असलेली कु. सुरभी महेंद्र लाड ही…. अचूक ठेका धरून प्रेक्षकांना जागेवर खिळवून ठेवते. प्राथमिक शाळेत शिकत असलेली ही चिमुरडी टिपरी नृत्य करताना सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधुन घेत आहे. स्तवन, वंदन, गण, गळवण, भोवरा, दिंडा मोडणे, होडी चालवणे इत्यादी सर्व पारंपरिक पद्धतीने टिपरी नृत्य सहकलाकारसमवेत करत आहे. प्रेक्षक टाळ्या वाजवून तर कौतुकाने बक्षीस देवू करतात तसेच सुरभीच्या टिपरी नृत्याचे व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर ठेवत आहेत. सुरभीने आतापर्यंत तालुक्यात ३०ठिकाणी आपल्या टिपरी नृत्य समुहासोबत नृत्य केले आहे. युट्युब वर तीन आठवड्यापूर्वी प्रसारित केलेल्या या टिपरी नृत्य समूहाच्या व्हिडिओला १८००० इतके व्ह्यूज आले आहेत. संगमेश्वर येथील या मुलीने अल्पावधीतच आपला ठसा उमटवला आहे.