रत्नागिरी: मालगुंड गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मालगुंड ग्रामपंचायतीने एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. ग्रामपंचायतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, मालगुंड येथील रुग्णांसाठी आवश्यक औषधांचा पुरवठा केला. आरोग्य केंद्रातील रुग्णसेवा अधिक प्रभावी व अखंडित राहावी, तसेच गावातील नागरिकांना तातडीने औषधे उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला.
या उपक्रमांतर्गत, उच्च रक्तदाब (High Blood Pressure) आणि रक्तातील साखरेचे कमी-जास्त प्रमाण (Diabetes) यासाठी लागणारी सुमारे १०,००० रुपये किमतीची औषधे ग्रामपंचायतीने आरोग्य केंद्राला दिली.
मालगुंडच्या सरपंच सौ. श्वेता खेऊर आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा औषधांचा साठा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक डॉ. परशुराम निवेंडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीने भविष्यातही आरोग्य सेवेमध्ये असेच सहकार्य सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.
या मदतीमुळे आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना रुग्णांवर योग्य वेळी उपचार करणे सोपे होणार आहे. या उपक्रमाचे गावातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात स्वागत केले आहे. ही मदत मिळवण्यासाठी डॉ. निवेंडकर यांनी विशेष प्रयत्न केले. मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सरपंच सौ. खेऊर आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मानले.