१६६ नागरिकांची झाले तपासणी
राजन लाड/जैतापूर : “टीबी मुक्त भारत अभियान” अंतर्गत आज अनसुरे उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात क्षयरोग प्रतिबंधक उपाययोजना म्हणून एक विशेष क्ष किरण (एक्स-रे) तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात एकूण १६६ नागरिकांची मोफत एक्स-रे तपासणी करण्यात आली.
ही तपासणी मुख्यतः ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, मधुमेहग्रस्त रुग्ण, मागील पाच वर्षांत क्षयरोग झालेल्या रुग्णांचे सहवासित अशा धोका असलेल्या गटांमध्ये करण्यात आली. कार्यक्रमाचा उद्देश टीबी रुग्णांची लवकर ओळख करून उपचार सुरू करणे व समाजात टीबीचे संक्रमण रोखणे हा होता.
या उपक्रमासाठी गावचे सरपंच श्री. रामचंद्र कणेरी यांनी पुढाकार घेतला. यावेळी जिल्हा क्षयरोग केंद्राचे पीपीएम समन्वयक श्री. श्रीकांत सावंत, आरोग्य सहायक श्री. मंगेश पाटील, क्ष-किरण तंत्रज्ञ श्री. निलेश हंगे, क्षयरोग पर्यवेक्षक श्री. राहुल कोकणे तसेच प्रयोगशाळा पर्यवेक्षक सौ. आचल मेळेकर यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्र, जैतापूर येथून आलेले सुपरवायझर श्री. महेश गावडे यांनी मार्गदर्शन केले. अणसुरे उपकेंद्राच्या आरोग्य सेविका श्रीमती वसावे, आरोग्य सेवक श्री. चौगुले, श्रीमती माळी गोरे, समुदाय आरोग्य अधिकारी श्री. अर्जुन (समुदाय अधिकारी साखर), श्रीमती रूमडे, तसेच गटप्रवर्तक आणि आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाची भूमिका बजावली.
या शिबिराच्या माध्यमातून समुदायात क्षयरोगाबद्दल जागरूकता वाढवणे आणि संशयित रुग्णांना त्वरित तपासणीसाठी प्रोत्साहन देणे असा सामाजिक आरोग्यविषयक उद्देश साध्य झाला.