तुषार पाचलकर/राजापूर : पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्यामंदिर पाचल या शाळेतील जिव्हाळ्याचे मुख्याध्यापक, गणित-विज्ञानाचे कुशल मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान असलेले श्री. तानाजी विठोबा देसाई सर यांचा स्वेच्छा सेवानिवृत्ती समारंभ १६ सप्टेंबर २०२५ रोजी अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला.
३७ वर्षांच्या अखंड सेवेतून ज्ञानदानाची अखंड ज्योत पेटवत, विज्ञान विभागात उल्लेखनीय कामगिरी करणारे, विज्ञान प्रदर्शनांना उंची देणारे आणि शेवटची सहा वर्षे एक कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक म्हणून शाळेचा दर्जा उंचावणारे देसाई सर यांची वाटचाल उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली.
या सोहळ्यास पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. अशोक सांगाराम सक्रे, सचिव श्री. रामचंद्र वरेकर, सहसचिव श्री. किशोरभाई नारकर, संचालक श्री. आण्णा पाथरे, श्री. सुनिल लिंगायत आदी मान्यवर उपस्थित होते. सरांचे माजी विद्यार्थी आणि करकचे उपसरपंच श्री. सुरेश ऐनारकर, शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष श्री. विनायक सक्रे, किसान छात्रालयाचे अधीक्षक शैलेश हुंदळेकर,संस्थेचे ज्येष्ठ सभासद श्री. दादा नारकर व त्यांची पत्नी, तसेच अनेक शिक्षक आणि माजी सहकारी यांचा सहभाग कार्यक्रमाला आपुलकीची उब देणारा ठरला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापिका सौ. खरात मॅडम यांनी सादर केले. शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनोगतांतून सरांबद्दलचा आदर आणि आपुलकी व्यक्त केली. कुटुंबातील मोठे बंधू श्री. संभाजी देसाई (संचालक – शेतकरी संघ, कोल्हापूर), मेव्हणे श्री. दत्तात्रय राणे, भावोजी श्री. प्रफुल्ल पवार, मुलगा आशिष देसाई, पत्नी सौ. देसाई मॅडम यांसह नातेवाईकांनीही या क्षणाचा साक्षीदार होत सरांना भावुक शुभेच्छा दिल्या.
संस्था, शिक्षकवृंद व माध्यमिक अध्यापक संघ यांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, पेहराव व सरस्वतीची चांदीची मूर्ती देऊन सरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत गीत श्री. लाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी सादर केले. श्री. कविस्कर सर यांनी ओघवत्या शब्दांत सूत्रसंचालन केले तर श्री. नेवरेकर सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
३७ वर्षांच्या अथक सेवेनंतर शाळेला ज्ञानाचा, शिस्तीचा आणि प्रेरणेचा वारसा देणाऱ्या तानाजी देसाई सरांचा हा निरोप सोहळा सर्वांच्या डोळ्यांत अभिमानाचे, तसेच हुरहुरीचे अश्रू ठेवून गेला.
पाचल हायस्कूलचे मुख्याध्यापक तानाजी देसाई यांच्या सेवानिवृत्तीने सारे गहिवरले
