दापोली: दापोली-दाभोळ मुख्य मार्गावरील रस्त्याच्या साईडपट्ट्या खचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. रविवारी याच मार्गावर प्रवास करत असताना दापोली आगाराची एक बस इतर वाहनाला बाजू देत असताना खचलेल्या साईडपट्टीमुळे रस्त्यावरून खाली घसरली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे मार्गाच्या दुरवस्थेकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
या मार्गावर खासगी कंपन्यांकडून करण्यात आलेली खोदकामे आणि रस्त्याच्या कामाचा निकृष्ट दर्जा यामुळे नागरिकांकडून तीव्र ओरड सुरू आहे. वारंवार पडणारे खड्डे, अपूर्ण साईडपट्टीची कामे आणि दर्जाहीन डांबरीकरण यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे. या मार्गाची तातडीने दुरुस्ती न झाल्यास भविष्यात मोठे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.