संगमेश्वर : तालुक्यातील मारळ नगरीत वसलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर पर्यटन स्थळी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने देवस्थानाच्या वतीने श्री मार्लेश्वर मंदिर दर्शनासाठीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दर श्रावण सोमवारी मंदिर सकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार असल्याची माहिती देवस्थानाच्या वतीने देण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे मार्गावर दरडी कोसळणे, वृक्ष उन्मळून पडणे यासारख्या घटना घडतात. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने श्री मार्लेश्वर मंदिर समितीने श्री देव मार्लेश्वर दर्शनाची वेळ निश्चित केली आहे. सर्वसाधारणपणे मंदिर सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले असते. मात्र, श्रावण सोमवारी सकाळपासूनच भक्तांची अलोट गर्दी होत असते. याची दखल देवस्थानने घेऊन भक्तगणांची गैरसोय होऊ नये म्हणून दर श्रावण सोमवारी मंदिर पहाटे ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले राहील, असे देवस्थानाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
भक्तांना रांगेत दर्शन घेता यावे यासाठी देवस्थानाच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली असून, स्वयंसेवकांची नेमणूकही करण्यात आली आहे. देवस्थानस्थळी देवरूख पोलीस, महावितरण, आरोग्य विभाग आणि महसूल विभागाचे कर्मचारी तैनात असतात. मार्लेश्वर पर्यटन स्थळी भाविकांनी वावरताना आपला पेहराव हा हिंदू परंपरेला साजेसा, सुसंस्कृत आणि शुचिर्भूत असावा, असे आवाहन श्री मार्लेश्वर देवस्थान समितीने केले आहे. यामुळे सांस्कृतिक वारसा आणि मंदिर परिसराचे पावित्र्य राखले जाईल, असेही समितीने स्पष्ट केले आहे.
मार्लेश्वर मंदिर दर श्रावण सोमवारी पहाटे ५ ते रात्री ८ दर्शनासाठी खुले राहणार
