GRAMIN SEARCH BANNER

साने गुरुजी कथाकथन स्पर्धेत खेर्डीच्या चिंचघरी सती विद्यालयाचे तिन्ही गटात प्रथम क्रमांक

Gramin Varta
13 Views

चिपळूण: चिपळूण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघामार्फत आयोजित पूज्य साने गुरुजी तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत खेर्डी येथील चिंचघरी सती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तिन्ही गटांत प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. रिगल कॉलेज कोंढे येथे बुधवार, १७ डिसेंबर रोजी ही स्पर्धा पार पडली.

या स्पर्धेत चिंचघरी सती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या ओघवत्या आणि प्रभावी शैलीने उपस्थितांची मने जिंकली. प्राथमिक गटात इयत्ता सहावीतील वेदांत महेंद्र महाडिक याने प्रथम क्रमांक मिळवला, तर माध्यमिक गटात इयत्ता नववीतील मृण्मयी प्रसाद जोग हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच उच्च माध्यमिक गटात इयत्ता अकरावी विज्ञान विभागातील भूमी नितीन कोलगे हिने प्रथम क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या तिन्ही विद्यार्थ्यांची आता २४ डिसेंबर रोजी खेड येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, संस्थेचे सेक्रेटरी महेश महाडिक, ज्येष्ठ संचालक शांताराम खानविलकर आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय वरेकर, उपमुख्याध्यापिका सुलोचना जगताप, मार्गदर्शक शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Total Visitor Counter

3377197
Share This Article