GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी खालगावचे युवा कलाशिक्षक रोशन गोताड ‘नमो-देवेंद्र जीवनरंग’ चित्रकला स्पर्धेत प्रथम, भाजपतर्फे सन्मान

Gramin Varta
329 Views

रत्नागिरी : तालुक्यातील खालगावचे रहिवासी आणि युवा कलाशिक्षक रोशन अर्जुन गोताड यांनी मुंबईत आयोजित ‘नमो-देवेंद्र जीवनरंग’ या चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.

भाजप मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ही चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी “मोदीजींचे व्हिजन” आणि “देवेंद्रजींचे नियोजन (मुंबईची सुरक्षा – मुंबईचा विकास)” हे विषय देण्यात आले होते. दादर, मुंबई येथे पार पडलेल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ₹21,000/- चे भव्य पारितोषिक देण्यात आले.

रोशन गोताड यांनी आपल्या अप्रतिम चित्रकलेच्या माध्यमातून हे यश संपादन केले. त्यांनी आपले कलाशिक्षक व जाकादेवी-तरवळ येथील सुपुत्र अर्जुन माचिवले यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळवले आहे. महाराष्ट्रभरातून आलेल्या 70 हून अधिक कलावंतांना मागे टाकत त्यांनी अव्वल स्थान पटकावले.

रोशन गोताड हे पोर्ट्रेट, लाईव्ह पेंटिंग, लँडस्केप, ब्लॅकबोर्ड आर्ट आणि कॅलिग्राफी यांसारख्या कलाप्रकारांमध्ये निपुण आहेत. त्यांनी पी. एल. देशपांडे आर्ट गॅलरी, नेहरू सेंटर आर्ट गॅलरी आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही सहभाग घेतला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

रत्नागिरीच्या बी.पी.के.के. महाविद्यालयातून एचएससी पूर्ण करून त्यांनी मुंबईतील मुद्रा स्कूल ऑफ आर्ट मधून डिप्लोमा शिक्षण घेतले. सध्या ते एन.जी.पी.एस.पी. गोकुल इंग्लिश स्कूल, दहीघर येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

पूर्वी त्यांना कॉलेज गोल्ड मेडल (2022), राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार (2022), आर्ट व्हिजन राजा रवी वर्मा पुरस्कार (2023) असे सन्मान मिळाले आहेत. याशिवाय, ग्रेट आर्टिस्ट (2024), राज्यस्तरीय ब्लॅकबोर्ड रायटिंग कॉम्पिटिशन (वुमन डे 2025) आणि राज्यस्तरीय गुणीजन कला पुरस्कार (2025) यांनीही त्यांना गौरविण्यात आले आहे.

या यशामुळे रत्नागिरीच्या कलाक्षेत्राचा लौकिक अधिक उंचावला आहे.

Total Visitor Counter

2646931
Share This Article