रिक्षा स्टँडवर अधिकृत दरपत्रक लावण्याचे निर्देश; घाट मार्गांवर आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या जिल्हावासीयांसह स्थानिक नागरिकांना प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन सुरू केले आहे. वाढीव रिक्षा भाडे, सीएनजीचा तुटवडा, महामार्गावरील वाहतूक कोंडी तसेच घाटमार्गातील संभाव्य अडथळे यावर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय व संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक रिक्षा स्टँडवर अधिकृत भाडेदराचे दरपत्रक ठळकपणे लावावे, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस अधीक्षक आरांक्षा यादव, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी ते खारेपाटण तसेच मिऱ्या-कोल्हापूर महामार्गावर वाहतूक सुरळीत राहण्यासाठी महामार्ग पोलीस, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), उपविभागीय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक, रेडियम आणि इतर सुरक्षा उपाययोजना कराव्यात. घाटमार्गांमध्ये दरड कोसळणे, झाडे उन्मळून पडणे किंवा अपघात झाल्यास तातडीने मदत मिळावी, यासाठी संबंधित यंत्रणा व आपत्कालीन पथके सज्ज ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होत असल्याने रेल्वे आणि एसटी वाहतुकीत समन्वय राखण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकाचा विचार करून राज्य परिवहन महामंडळाने अतिरिक्त बसफेऱ्यांचे नियोजन करावे, जेणेकरून रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाल्यास त्यांना पुढील प्रवासासाठी पुरेशी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होईल, असे निर्देश देण्यात आले.
रिक्षा भाडेवाढीच्या तक्रारींना आळा घालण्यासाठी आरटीओ विभागाने रिक्षाचालकांची तातडीने बैठक घेऊन मीटरची तपासणी पूर्ण करावी. तसेच प्रत्येक रिक्षा स्टँडवर अधिकृत भाडेदराचे फलक लावून प्रवाशांना दरांची स्पष्ट माहिती उपलब्ध करून द्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
उत्सव काळात वाढणाऱ्या प्रवासी व वाहनांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर सीएनजीचा अखंड पुरवठा राहण्यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर महावितरणने गणेशोत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी करावी आणि संभाव्य तांत्रिक बिघाड तातडीने दूर करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, असेही सांगण्यात आले.
गणेशोत्सवातील खाद्यपदार्थांच्या वाढत्या मागणीचा विचार करून अन्न व औषध प्रशासनाने बाजारपेठेतील मिठाई, प्रसाद आणि इतर खाद्यपदार्थांची तपासणी करावी. नागरिकांच्या आरोग्याशी कोणताही धोका निर्माण होणार नाही, यासाठी भेसळ व निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच नगरपरिषदा व नगरपंचायतींनी विसर्जन घाटांवर आवश्यक त्या ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड आणि निर्माल्य कलशांची पुरेशी व्यवस्था करावी, असेही निर्देश देण्यात आले.
रात्री मोबाईल बंद ठेवू नका; पोलीस यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना
दरम्यान, गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेने सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले. उत्सव काळात कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने प्रतिसाद देता यावा, यासाठी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेषतः रात्रीच्या वेळी मोबाईल फोन बंद ठेवू नयेत आणि परस्परांच्या संपर्कात राहावे, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या.
गणेशोत्सव हा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक असल्याने या काळात वाहतूक, आरोग्य, वीज, सार्वजनिक वाहतूक, इंधनपुरवठा, कायदा व सुव्यवस्था तसेच विसर्जन व्यवस्थापन या सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. नागरिक आणि गणेशभक्तांना सुरक्षित, सुरळीत व त्रासमुक्त गणेशोत्सवाचा अनुभव मिळावा, यासाठी प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवण्यावर भर दिला आहे.
गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज; रिक्षा भाडे, घाटमार्ग आणि सीएनजी तुटवड्यावर जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष लक्ष
Leave a Comment






