रत्नागिरी: गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी लांजा, राजापूर आणि साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी आज मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी गणेशोत्सवापूर्वी महामार्गाचे काम मार्गी लावण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून, मुंबईसह देशभरातून लाखो चाकरमानी कोकणात आपल्या गावी येतात. या प्रवासादरम्यान त्यांना रस्त्यांमुळे त्रास होऊ नये यासाठी आमदार सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. लांजा ते राजापूर दरम्यानच्या महामार्गाच्या कामाची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता कुलकर्णी, कोशिक रहाटे, जे. एम. म्हात्रे, जी. एम. हलेश, संगमेश्वर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्यासह ठेकेदार, पोलीस प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार सामंत यांनी यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामाचा आढावा घेतला. त्यांनी महामार्गाची कामे तातडीने पूर्ण करून गणेशोत्सवापूर्वी रस्ते सुस्थितीत आणण्याची सूचना केली. खराब रस्त्यांमुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची कल्पना असल्याने ही पाहणी करण्यात आली. त्यांच्या या पुढाकारामुळे गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.