GRAMIN SEARCH BANNER

३४ गावांच्या नळपाणी योजनेत १७ कोटींची वाढ; मुदतवाढीचा प्रश्न ऐरणीवर

Gramin Varta
7 Views

रत्नागिरी : मिऱ्या-शिरगाव व अन्य ३४ गावांसाठी सुरू असलेली प्रादेशिक नळपाणी योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. योजनेच्या मूळ ११२ कोटींच्या खर्चात आधीच वाढ होऊन ती १३५ कोटींवर गेली होती. आता आणखी १७ कोटींचा वाढीव प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याने ही योजना १५२ कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, योजनेच्या अंमलबजावणीत अनेक अडथळे निर्माण होत असल्याने ती दिलेल्या वेळेत पूर्ण होईल का, यावर शंका निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत रत्नागिरी तालुक्यातील ३४ गावांमध्ये ही योजना राबवली जात आहे. जलजीवन मिशनअंतर्गत १ लाख ८६ हजार २०५ लोकसंख्येला दररोज ५५ लिटर शुद्ध पाणी देण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी ११८.१० किमी लांबीची पाईपलाईन टाकायची असून त्यापैकी ७५ किमी गुरुत्ववाहिनीचे काम पूर्ण झाले आहे.

तथापि, उर्वरित कामांमध्ये अनेक अडचणी येत आहेत. ठेकेदाराचे सुमारे ११ कोटी रुपये अदा न झाल्याने कामाचा वेग मंदावला आहे. टाक्यांसाठी जागा उपलब्ध नसणे, रस्त्याच्या बाजूने पाईपलाईनसाठी जागा संपादन न होणे, ग्रामपंचायतीकडून अपेक्षित सहकार्य न मिळणे, अशा अनेक कारणांनी काम खोळंबले आहे.

या योजनेचे काम दोन वर्षांत पूर्ण करायचे होते; मात्र आतापर्यंत केवळ ५२ टक्के काम पूर्ण झाले आहे. शासनाने योजनेला आता ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. परंतु, जागांच्या कमतरतेमुळे व तांत्रिक अडचणींमुळे कामाच्या वेळेत पूर्ततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

आतापर्यंत ठेकेदाराला ४८ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. मात्र, साहित्याच्या वाढत्या किंमती, तांत्रिक बाबींची नोंद आणि इतर अडचणी लक्षात घेता, आता १७ कोटींचा वाढीव खर्च शासनाकडे प्रस्तावित केला जाणार आहे.

Total Visitor Counter

2647032
Share This Article