GRAMIN SEARCH BANNER

ग्रामविकासासाठी आमदार किरण सामंत यांचा पुढाकार — ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमातून गावोगावी दौरा

लांजा : तालुक्यातील गावागावात दौरा करत ग्रामीण भागातील अपूर्ण विकासकामे पावसाळ्यानंतर पूर्णत्वास नेऊ, असा विश्वास आमदार किरण सामंत यांनी नागरिकांना दिला. गाव दौऱ्यात त्यांनी अधिकाऱ्यांना सक्त सूचना देत नागरी सुविधांकडे बेजबाबदारपणे पाहणे सहन केले जाणार नाही, हे स्पष्ट केले.

‘आमदार आपल्या दारी’ या संकल्पनेतून आमदार किरण सामंत यांनी ग्रामीण भागातील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांचे प्रश्न समजून घेतले. त्यांच्या या उपक्रमामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, ही संकल्पना लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा क्षेत्रात प्रथमच राबवण्यात आली आहे.

ग्रामपंचायतनिहाय गावभेटी दरम्यान शासकीय अधिकाऱ्यांनाही सहभागी करून घेत, अपूर्ण कामांची माहिती व नव्या कामांची मागणी जाणून घेण्यात आली. या दौऱ्यात आंजणारी, वेरळ, कणगवली, तळवडे, कुरचुंब, आडवली, देवधे, आसगे, बेनिखुर्द, वाडगाव, वेरवली बुद्रुक, वेरवली खुर्द-पडवण या गावांमधील नागरिकांशी संवाद साधण्यात आला.

दौऱ्यात बांधकाम, आरोग्य, कृषी, पाणीपुरवठा, सामाजिक वनीकरण, महावितरण, वनविभाग, एसटी, शैक्षणिक, पशुविकास, महिला व बालकल्याण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विविध खात्यांच्या कामकाजाचा आढावा घेत ग्रामविकासाच्या दृष्टीने पुढील दिशा ठरवण्यात आली.

कार्यक्रमावेळी शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील उर्फ राजू कुरूप, तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, जिल्हा बँक संचालक महेश उर्फ मुन्ना खामकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार सामंत यांच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Total Visitor Counter

2455556
Share This Article