GRAMIN SEARCH BANNER

बॅगेतून चोरीला गेलेला मोबाईल शोधण्यात सावर्डे पोलिसांना यश; विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर उमटले हास्य

Gramin Varta
150 Views

सावर्डे: डेरवण येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांदरम्यान मालदोली नं. १ शाळेतील विद्यार्थ्याचा चोरीला गेलेला मोबाईल शोधून काढण्यात सावर्डे पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या या तत्परतेमुळे विद्यार्थ्याला आपला हरवलेला ठेवा परत मिळाला असून, शिक्षकांनी पोलिसांच्या या कामगिरीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत मालदोली नं. १ शाळेचे विद्यार्थी शिक्षक जयकुमार व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाले होते. खेळ सुरू असताना अचानक एका विद्यार्थ्याच्या बॅगेतून मोबाईल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. सर्वत्र शोधाशोध करूनही मोबाईल मिळून न आल्याने संबंधित विद्यार्थी कमालीचा खचला होता. ही बाब लक्षात येताच शिक्षक जयकुमार व्यवहारे यांनी तातडीने सावर्डे पोलीस ठाणे गाठले. पोलीस कॉन्स्टेबल स्नेहा घोसाळकर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तक्रार स्वीकारली आणि मोबाईल शोधून देण्याचे आश्वासन दिले.

तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच ते सहा दिवसांत पोलीस कॉन्स्टेबल सुनील भांगरे यांनी अत्यंत मेहनतीने आणि तांत्रिक कौशल्याचा वापर करून चोरीला गेलेला मोबाईल शोधून काढला. सापडलेला मोबाईल शिक्षक जयकुमार व्यवहारे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. आपला हरवलेला मोबाईल परत मिळाल्याचे पाहून विद्यार्थ्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल शिक्षक व्यवहारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्नेहा घोसाळकर व सुनील भांगरे यांचे मनःपूर्वक आभार मानले. आजच्या धावपळीच्या काळात पोलिसांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेमुळे ‘पोलीस म्हणजे केवळ कायदा नाही, तर माणुसकीचा आधार’ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, सावर्डे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

3366874
Share This Article