GRAMIN SEARCH BANNER

बावनदी उतारात भीषण अपघात; ट्रेलरच्या धडकेत सिंधुदुर्गातील टेम्पो चालकाचा मृत्यू

Gramin Varta
877 Views

रत्नागिरी :  मुंबई–गोवा महामार्गावरील बावनदी येथील उतारावर भरधाव वेगात असलेल्या ट्रेलरने पुढील दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर नियंत्रण सुटलेल्या ट्रेलरने समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात टेम्पो चालकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. १५) रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडली.

ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रणय रविंद्र काडगे (रा. शिरवली, देवगड, जि. सिंधुदुर्ग) असे अपघातात मृत्यू झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. या प्रकरणी ट्रेलर चालक मोहम्मद कासिम लियाज खान (वय ४८, रा. जि. नवादा, बिहार) याच्याविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार संशयित ट्रेलर चालक मोहम्मद खान हा आपल्या ताब्यातील ट्रेलर (एमएच-०१-ईएम-२९५१) गोव्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात घेऊन जात होता. निवळी–बावनदी येथील उतारावर आला असता त्याने रस्त्यावरील पुढील दुचाकीला (एमएच-४२-बीटी-४७१०) पाठीमागून धडक दिली. त्यानंतर ट्रेलर पुढे जाऊन समोरून येणाऱ्या टेम्पोला (एमएच-०७-एजे-४३२४) जोरदार धडकला.

या अपघातात टेम्पो चालक प्रणय काडगे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी संजना पवार (वय ४१, रा. निवळी, कोकजेवठार, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून संशयित ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Total Visitor Counter

3072103
Share This Article