GRAMIN SEARCH BANNER

अलिबागमधील थेरोंडा-पालव साकव कोसळला;ग्रामस्थ संतप्त

अलिबाग: तालुक्यातील थेरोंडा – पालव गावांना जोडणारा प्रमुख साकव अखेर कोसळला असून या दुर्घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे या साकवाची अवस्था धोकादायक असल्याची वारंवार तक्रार काँग्रेसचे नेते अशोक अंबुकर यांनी प्रशासनाकडे केली होती.

मात्र संबंधित विभागाकडून वेळेवर योग्य उपाययोजना न झाल्याने आज ही दुर्घटना घडली आहे.

या साकवाचा वापर शालेय विद्यार्थी, वृद्ध, रुग्ण आणि शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. याच मार्गावरून दररोज अनेकजण पायी आणि वाहनांनी ये-जा करत होते. पावसामुळे खालचा पाण्याचा प्रवाह वाढल्याने आणि साकवाची स्थिती आधीच कमकुवत झाल्यामुळे अखेर कोसळला.

अशोक अंबुकर यांनी याआधीच जिल्हा प्रशासनाला निवेदन देत हा साकव जीर्ण अवस्थेत असून तात्काळ दुरुस्ती किंवा नवीन साकव बांधण्याची मागणी केली होती. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, जर वेळेवर दखल घेतली नाही, तर मोठा अपघात किंवा दुर्घटना घडू शकते. परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यानेच हा साकव कोसळल्याचा आरोप आता स्थानिकांकडून होत आहे.

गावातील नागरिकांनी तात्काळ नव्या साकवाचे काम सुरू करण्याची मागणी केली असून भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी पावसाळ्यात अशा धोकादायक साकवांची तपासणी करून वेळेत उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

2455556
Share This Article