प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू
मुंबई : चेंबूर आणि मैसूर कॉलनीदरम्यान मोनो रेल ठप्प झाली आहे. अंदाजे 6 वाजता मोनोरेल थांबली. त्यानंतर मोनोरेलमधील एसी बंद पडला आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागलेला आहे. मोनोरेल सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.
मोनोरेल सेवा ठप्प झाल्याने आत अडकलेल्या अंदाजे 200 प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.
मोनोरेल अचानक थांबल्यामुळे सुरुवातीला प्रवाशांना काय झाले कळले नाही. मात्र, त्यातील वीजपुरवठा बंद झाला. परिणामी एसी बंद झाला. त्यामुळे 6 वाजल्यापासून प्रवासी बेजार झाले आहेत. काहींनवा श्वसनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नशील आहेत. अग्निशमन दलाने दोन शिड्या लावून एक काच थोडीशी फोडून प्रवाशांन दिलासा दिला आहे. मोनोरेलमधील वीजपुरवठा बंद झाल्याने प्रवासी घामाघूम झाले आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाकडून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मुंबईत तुफान पाऊस झाल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली तसेच रस्ते वाहतुकीला ब्रेक लागला. यातून मार्ग काढण्यासाठी प्रवाशांनी मोनोरेलचा पर्याय स्वीकारला. मात्र, मोनोरेलनेही दगा दिला. त्यामुळे प्रवाशांची घालमेल सुरू आहे. प्रवाशी घाबरून गेले असून आम्हाला वाचवा, अशी विनवणी ते वारंवार अग्निशमन दलाच्या जवानांना करत आहेत. दरम्यान, मोनोरेलच्या तातडीच्या खिडक्या उघडल्याने प्रवाशांचा त्रास कमी होईल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.