GRAMIN SEARCH BANNER

राजापूरजवळ एसटी बस आणि आयशर टेम्पो अपघातप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा

Gramin Varta
7 Views

राजापूर : तालुक्यात सौंदळ ग्रामपंचायतीसमोर काल, २५ जुलै २०२५ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. ओणी ते पाचल रस्त्यावर एका आयशर टेम्पोने समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात एसटी बसमधील अनेक प्रवासी, तसेच टेम्पोमधील एक व्यक्ती जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मिळालेल्या माहितीनुसार, रामदास हरिश्चंद्र देशमुख (वय ३८, व्यवसाय चालक तथा वाहक, एस.टी. आगार राजापूर) हे आपली एम.एच.२० बी.एल २२७१ क्रमांकाची एसटी बस आंजिवली ते रत्नागिरी अशी घेऊन जात होते. सौंदळ ग्रामपंचायतीसमोर चढणीवर आले असताना, समोरून येणाऱ्या एम.एच.०९/जी.जे/३८८० क्रमांकाच्या आयशर टेम्पोचा चालक बाळाप्पा रामचंद्र हगेद (वय ५५, रा. कणेरी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) याने आपला टेम्पो हयगयीने, निष्काळजीपणे आणि अतिवेगाने चालवून एसटी बसला जोरदार धडक दिली.

या धडकेमुळे एसटी बसमधील प्रवाशांना आणि आयशर टेम्पोमधील प्रतिक तानाजी संकपाळ यांना लहान-मोठ्या दुखापती झाल्या. अपघातात जखमी झालेल्यांमध्ये अथर्व मास्ती लिंगायत (रा. रायपटण), सी. स्वाती ऋषिकेश चव्हाण (रा. तळवडे), सौ. प्रतिभा दिनेश चव्हाण (रा. तळवडे), देवांश दिनेश चव्हाण (रा. तळवडे), रामदास हरिश्चंद्र देशमुख (एसटी चालक), विजय संभाजी शिंदेदेसाई (एसटी वाहक) आणि प्रतिक तानाजी संकपाळ (टेम्पोतील व्यक्ती, रा. कोल्हापूर) यांचा समावेश आहे.

अपघातानंतर टेम्पो चालक बाळाप्पा हगेद याने कोणतीही मदत न करता किंवा जखमींना रुग्णालयात दाखल न करता घटनास्थळावरून पळ काढला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात बाळाप्पा रामचंद्र हगेद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

2647390
Share This Article