जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन, यापेक्षा ‘माझ्यासाठी कला’ हे महत्त्वाचे- जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते
रत्नागिरी: माणसाला मृत्यू असतो. अक्षरांना आयुष्य असते. त्यामुळे जमेल तसे प्रत्येकांने लिहित रहा, लिहिते व्हा आणि अक्षर रुपाने जिवंत रहा. जीवनसाठी कला की कलेसाठी जीवन या दंद्वात न पडता ‘माझ्यासाठी कला’ हे सध्याच्या धकाधकीत फार महत्त्वाचे आहे. ते स्वीकारले पाहिजे, असे मार्गदर्शन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले.
राज्य शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागात आज वस्तू व सेवा कर दिनानिमित्त रक्तदान शिबीर, वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. अनाथ मुलांसाठी स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शनपर पुस्तकांचे वितरण दर्पण फाऊंडेशनला करण्यात आले. प्रमुख पाहुणे जिल्हा माहिती अधिकारी श्री. सातपुते म्हणाले, राज्य शासनाचा वस्तू व सेवा कर हा विभाग राज्याच्या विकासामध्ये कर रुपातून मोठा हातभार लावत असतो. त्यांच्या या कार्यातूनच विविध क्षेत्राच्या विकासाला निधी उपलब्ध होतो. मधमाशी ज्या प्रमाणे फुलाला न दुखवता मध गोळा करत असते, तसेच या विभागाचे कर गोळा करताना वर्णन केले जाते. परंतु, कर चुकवेगिरी करणाऱ्यांना कारवाईच्या रुपाने हा विभाग डंकही मारत असतो. प्रत्येक माणसामध्ये एक कलाकार लपलेला असतो. या कलाकाराला काळाच्या ओघात मारायचे की तारायचे हे प्रत्येकांनी ठरविले पाहिजे. सद्याच्या धकाधकीच्या जीवनात एखादी कला जोपासली पाहिजे. त्या कलेच्या माध्यमातून कलाकार हा खरा जिवंत राहतो, असे सांगून त्यांनी स्वलिखित ‘वरात’ या विनोदी कथेचे कथन केले.
अध्यक्षीय भाषणात राज्यकर उपायुक्त संदीप माने यांनी कर संकलनाबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, संपूर्ण देशाचे कर संकलन २२ लाख ८ हजार ८६१ कोटी. यातील महाराष्ट्राचे कर संकलन ३ लाख ५९ हजार ८५५ कोटी इतका आहे त्या खालोखाल कर्नाटक एक लाख ५९ हजार ५८४ कोटी इतका आहे महाराष्ट्रामध्ये करदत्त्याची त्यांची संख्या १० लाख ७४ हजार १२० आहे.
देशाच्या विकासामध्ये जीएसटी कर संकलनाचा मोठा वाटा आहे.माननीय नांदेडकर साहेब अप्पर राज्यकर आयुक्त व माननीय श्रीमती थोरात मॅडम राज्यकर सहआयुक्त कोल्हापूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी कार्यालय येथे 1 जुलै वस्तू व सेवा कर दिन उत्साहात साजरा करण्यात आला.राज्यकर उपायुक्त विकास पवार यांनीही यावेळी विशेष मार्गदर्शन केले. राज्यकर अधिकारी रितेश धायगुडे यांनी प्रास्ताविक केले. राज्यकर अधिकारी फारुख ठगरी यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला.
राज्य कर निरीक्षक सुप्रिया राऊत, राज्यकर निरीक्षक अमित पुंडे, कर सहाय्यक गंधाली जाधव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आजच्या रक्तदान शिबिरात 20 दात्यांनी आपले रक्तदान केले. राज्यकर निरीक्षक धनश्री महाडिक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर, राज्यकर निरीक्षक अजित देवकुळे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.