GRAMIN SEARCH BANNER

राज्यात कौटुंबिक हिंसाचाराची ३२ हजार प्रकरणे, हुंडाबळीच्या ४७३ घटना

मुंबई: राज्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. मागील तीन वर्षात राज्यात पतीकडून पत्नीला क्रुर वागणूक दिली गेल्याची ३२ हजार ३५५ प्रकरणात पती व घरातील इतर पुरुषांवर दोषारोप दाखल झाले आहेत.

प्रत्यक्षात ३३ हजार १३२ प्रकरणात पुरुषांवर गुन्हे दाखल झाले आहेत. ७७७ प्रकरणात पुरुष या गुन्हयात निर्दोष आढळून आले आहेत. पतीकडून क्रुर वागणूकीबरोबर वैष्णवी हगवणे प्रकरणासारख्या ४७३ प्रकरणे हुंडाबळीची आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती विधान परिषद सदस्य डाॅ. प्रज्ञा सातव, चित्रा वाघ यांच्या प्रश्नावर सभागृहाला दिली

राज्यात महिला अत्याचाराची प्रकरणे दिवसेदिवस वाढू लागली आहेत. १२ ऑक्टोबर २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा पातळीवर महिलांवर होणाऱ्या अन्यायाचा तपास करण्यासाठी तपास पथके स्थापन करण्यात आली आहेत. महिलांवर होणाऱ्या अत्याचारासाठी शासनाने गेल्या वर्षी २० नोव्हेंबर रोजी मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या आहेत.

कौटुंबिक हिंसाचारात गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिस ठाण्यात समुपदेशन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. पोलिस ठाण्याच्या पातळीवर महिला सुरक्षा समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. शासन आणि पोलिस यांच्याकडून अनेक उपाययोजना केल्या जात असताना २०२२ मध्ये पतीकडून क्रुर वागणूक मिळत असल्याच्या ११ हजार ३६७ गुन्हे दाखल झाले आहेत. यातील १० हजार ७३९ प्रकरणात पती व घरातील सासरे, दीर पुरुषांवर दोषारोप दाखल केले गेले आहेत.

२०२३ मध्ये गुन्हे दाखल होण्याची ही संख्या ११ हजार २२६ होती तर ११ हजार १५८ प्रकरणात दोषारोप झाले आहेत. गेल्या वर्षी ही संख्या थोडी कमी आहे. १० हजार ५३९ प्रकरणात पती व घरातील इतर पुरुषांवर गुन्हे दाखल झाले तर १० हजार ४२८ प्रकरणात पतीला शिक्षा झाली आहे. सरासरी गुन्हयाची संख्या पाहता मागील सहा महिन्यात पाच ते सहा हजार कौटुंबिक अत्याचाराची प्रकरणे विविध पोलिस ठाण्यात दाखल झाल्याची शक्यता आहे. कौटुंबिक अत्याचारांच्या या प्रकरणाबरोबर हुंडाबळीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. मागील तीन वर्षात ४७३ गुन्हे हे हुंडाबळीचे नोंदविले गेले आहेत. २०२२ (१७१) २०२३ (१६७) आणि गतवर्षी (१३५) गुन्हे हुंडाबळीचे आहेत.

Total Visitor Counter

2474941
Share This Article