मिलिंद देसाई / चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे येथील राजसत्तेचे मानकरी श्री. मिलिंद शांताराम जुवेकर यांच्या निवासस्थानी श्रीकृष्ण जयंती उत्सव 15 ऑगस्ट रोजी रात्री मित्रपरिवार, नातेवाईक, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरवात ग्रामस्थांच्या भजन सेवेने झाली. त्यानंतर रत्नागिरी मधील एक कलाकार श्री. श्रीकांत ढालकर यांनी निरनिराळ्या पक्षांचे आवाज, मिमिक्री, ओठांची हालचाल न करता गाणी सादर करून उपस्थित कृष्ण भक्तांची दाद मिळवली.
यानंतर देवरुख येथील कीर्तनकार श्री. कुमार भाट्ये यांचा कृष्ण जन्माष्टमी वर कीर्तनाचा कार्यक्रम झाला. त्याला हार्मोनियम साथ श्री. संतोष करंदीकर, चिपळूण आणि तबला साथ श्री. किशोर भाट्ये यांनी केली.
दुसऱ्या दिवशी दहीहंडी चा उत्सव स्थानिक गोविंदा पथकाने हजेरी लावून उंच मनोरे रचून साजरा केला. श्री. मिलिंद जुवेकर यांनी उपस्थित गोविंदा आणि कृष्ण भक्तांचे आभार मानले. महाप्रसादाने या उत्सवाची सांगता झाली.
पिरंदवणे येथे गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात साजरा
