GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: लांजा येथे आरक्षित वनक्षेत्रातून सागवान लाकडाची अवैध तोड; ७ आरोपींना अटक

Gramin Varta
374 Views

क्रेनसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

लांजा: लांजा वन विभागाने सागवान लाकडाच्या अवैध चोरी प्रकरणी मोठी कारवाई करत सात संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. लांजा तालुक्यातील मौजे कुर्णे येथील राखीव वनक्षेत्रातून (वन सर्व्हे नं. १९१/१) चोरलेल्या ३ लाख १४ हजार ७९० रुपये किमतीचा सागवान लाकडाचा मोठा साठा वन विभागाने जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लांजा वन विभागाचे वनपाल आणि वनरक्षक दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी कुर्णे येथील राखीव वनक्षेत्रात नियमित गस्त घालत असताना त्यांना साग जातीच्या एकूण ७ झाडांची अवैध चोरतूट झाल्याचे निदर्शनास आले. यातील काही तोडलेला माल जागेवरच होता, तर उर्वरित लाकूड फरार करण्यात आले होते. याप्रकरणी वनरक्षक लांजा यांच्या तक्रारीवरून भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २६(१)फ नुसार गुन्हा क्र. C०३/२०२५ दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासामध्ये दि. २४ सप्टेंबर २०२५ रोजी वन विभागाने सात संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची नावे अशी: (१) मनोज संजय पाटणकर, (२) मंदार संजय पाटणकर, (३) अजय नागूप्रसाद निषाद, (४) शत्रुघ्न दत्ताराम गोठणकर, (५) विजयकुमार रामशंकर निषाद, (६) मंदार मनमोहन बारस्कर, आणि (७) शुभम रवींद्र गुरव (सर्व रा. कुंभवडे).

आरोपी मनोज संजय पाटणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरलेले सागवान लाकूड रातोरात क्रेनच्या साहाय्याने ट्रकमध्ये भरून कुर्णे येथून कुंभवडे येथे नेण्यात आले. तेथे उतरवून पुन्हा दुसऱ्या ट्रकने मौजे माडबन येथील कसबा मिठगवाने पिकप शेडपासून सुमारे ४०० मीटर अंतरावर असलेल्या ‘पठार’ नावाच्या स्थानिक ठिकाणी लपवून ठेवण्यात आले होते. वन विभागाने तात्काळ घटनास्थळी जाऊन ३१ नग, एकूण ७.४९५ घनमीटर सागवान लाकूड जप्त केले. या मालाची बाजारभावाने अंदाजे किंमत ३ लाख १४ हजार ७९० रुपये इतकी आहे. हा सागवान लाकडाचा साठा पुढील सुरक्षिततेसाठी वनरक्षक लांजा यांच्याकडे ताबा पावतीने सुपूर्द करण्यात आला आहे. तसेच लांजा येथे वापरलेली क्रेन क्रमांक MH09GM0452 देखील जप्त करण्यात आली आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू असून, यामध्ये समाविष्ट इतर वाहने व साधनसामग्रीचा शोध घेतला जात आहे. मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर श्री. गुरुप्रसाद सर, विभागीय वन अधिकारी रत्नागिरी श्रीमती गिरिजा देसाई, आणि सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण-रत्नागिरी श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे. सदर कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. प्रकाश सुतार, वनपरिक्षेत्र वनअधिकारी फिरते पथक रत्नागिरी श्री. जितेंद्र गुजले यांच्यासह वनपाल श्री. जयराम बावदाणे (राजापूर), श्री. सारिक फकीर (लांजा), श्री. न्हानू गावडे (पाली), श्री. सागर गोसावी (देवरुख), श्री. जी.एम. पाटील आणि वनरक्षक श्रीमती नमिता कांबळे (लांजा), श्रीमती श्रावणी पवार (कोर्ले) यांच्यासह इतर वनरक्षक पथकाने सहभाग घेतला. वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ वर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वन अधिकारी रत्नागिरी श्रीमती गिरिजा देसाई यांनी केले आहे. पुढील तपास वेगाने सुरू आहे.

Total Visitor Counter

2652258
Share This Article