GRAMIN SEARCH BANNER

गुहागर: जानवळे ग्रामपंचायत इमारतीसाठी निधी न मिळाल्यास १५ ऑगस्टला मनसेचा उपोषण इशारा

गुहागर : गुहागर तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायत इमारत धोकादायक स्थितीत असून नवीन इमारतीसाठी त्वरित निधी देण्यात यावा या इमारतीसाठी निधी उपलब्ध न झाल्यास स्वातंत्र्यदिनी दि.१५ ऑगस्ट रोजी पंचायत समिती गुहागर कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी दिला आहे.

यावेळी बोलताना मनसे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी सांगितले की, जानवळे गावातील ग्रामपंचायतीच्या इमारतीची दयनीय अवस्था झाली असून इमारत पूर्णपणे नादुरुस्त आहे. या इमारतीत बसणारे व काम करणारे कर्मचारी व पदाधिकारी जीव मुठीत घेऊन बसतात. पावसाळ्यात तर इमारतीच्या छपरावर प्लास्टिक टाकण्याची वेळ येते. गेली अनेक वर्षे पंचायत समिती गुहागर व जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडे मागणी करूनही सदर नवीन इमारतीसाठी निधी देण्यात आला नाही. पंचायत समिती गुहागर फक्त कागदी घोडे रंगवत असून अद्यापही या इमारतीला निधी उपलब्ध होऊ शकला नाही.

सदरची इमारत सध्या धोकादायक बनली असून कधी इमारत कोसळेल याचा भरवसा नाही. जानवळे ग्रामपंचायत इमारतीबाबत “मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना” अंतर्गत गुहागर तालुक्यातील मोडकळीस आलेल्या व वापरास धोकादायक झालेल्या इमारती यांचा आढावा घेवून सदर इमारतीचे निर्लेखन करुन मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधणे योजनांतर्गत मंजुर करण्यात येईल असे पत्रही पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी यांच्याकडून देण्यात आले होते. परंतु आजतगायत कोणतेही ठोस कार्यवाही या इमारती बाबत झाली नाही.तरी या इमारतीसाठी निधी उपलब्ध न झाल्यास उपोषणाला बसणार असल्याचे विनोद जानवळकर यांनी सांगितले.

Total Visitor Counter

2455607
Share This Article