GRAMIN SEARCH BANNER

लोटे उद्योग भवनमध्ये रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Gramin Varta
5 Views

३९५ उमेदवारांपैकी ३४ जणांना थेट रोजगार संधी

खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील उद्योग भवनमध्ये दिनांक २२ जुलै रोजी पार पडलेल्या भव्य रोजगार मेळाव्याला जिल्ह्यातील तरुण उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित या मेळाव्याचे आयोजन लोटे परशुराम उद्योजक संघटनेच्या सहकार्याने करण्यात आले होते.

या मेळाव्याचे उद्घाटन आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त इनुजा शेख, दीपक लोंढे, मोरेश्वर दुधाळ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

जिल्ह्यातील दहा आघाडीच्या औद्योगिक आस्थापनांनी एकूण ६३१ रिक्त पदांची नोंदणी या मेळाव्यासाठी केली होती. उद्योग प्रतिनिधींनी थेट मुलाखती घेऊन ३९५ उमेदवारांमधून ७४ जणांची प्राथमिक निवड केली, तर त्यातील ३४ उमेदवारांना तात्काळ रोजगाराची संधी देण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येणाऱ्या “पंडित दिनदयाळ शर्मा रोजगार मेळावा” उपक्रमाअंतर्गत लोटे येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी बोलताना सहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांनी सांगितले, “राज्य शासनाच्या उद्दिष्टांनुसार आम्ही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात किमान दोन रोजगार मेळावे आयोजित करत आहोत. याशिवाय रोजगार मार्गदर्शन शिबिरेही राबवली जात आहेत. मेळाव्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांचा अहवालही संकलित केला जातो.”

या उपक्रमामुळे जिल्ह्यातील स्थानिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून, औद्योगिक विकासाला गती देणारा ठोस पाऊल म्हणून या मेळाव्याकडे पाहिले जात आहे.

Total Visitor Counter

2650869
Share This Article