रत्नागिरी: नाणिज येथे दागिने चोरीच्या आरोपाखाली दाखल असलेल्या एका तरुणाची रत्नागिरी न्यायालयाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे. पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा खोटा आणि जाणूनबुजून त्रास देण्यासाठी होता, असे बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आरोपीच्या वतीने विधी सेवा प्राधिकरणाने नेमलेल्या ॲड. आयुधा देसाई यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.
जून २०२४ मध्ये कैलास प्रकाश संसारे नावाच्या व्यक्तीवर चोरीचा गुन्हा (कलम ३८०) दाखल करण्यात आला होता. फिर्यादीच्या घरातून दागिने चोरल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता.
आर्थिक परिस्थितीमुळे वकील नेमणे शक्य नसल्याने, विधी सेवा प्राधिकरणामार्फत चालणाऱ्या लोक अभिरक्षक कार्यालयाकडून त्याला मोफत कायदेशीर मदत मिळाली.
या खटल्यामध्ये सरकार पक्षाने एकूण १० साक्षीदार तपासले. विशेष म्हणजे, यातील एकही साक्षीदार फितूर झाला नव्हता. मात्र, बचाव पक्षाच्या वकील ॲड. आयुधा देसाई यांनी साक्षीदारांचा उलटतपास करताना त्यांच्या जबाबातील अनेक त्रुटी आणि विसंगती न्यायालयासमोर मांडल्या. तसेच, पोलिसांच्या तपासकामातील उणिवा आणि आरोपीला जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न कसा केला गेला, हे स्पष्टपणे दाखवून दिले.
ॲड. देसाई यांनी सादर केलेल्या पुराव्यांचा आणि युक्तिवादाचा विचार करून रत्नागिरीच्या मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती ए. ए. पिंगळे यांनी आरोपी कैलास संसारे याची निर्दोष मुक्तता करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला. या निर्णयामुळे संसारे याला मोठा दिलासा मिळाला असून, विधी सेवा प्राधिकरणामार्फत मिळणाऱ्या कायदेशीर मदतीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.