मुंबई : नाणीज (जि. रत्नागिरी) येथील दक्षिण पिठाचे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान करावा, अशी मागणी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रात राणे यांनी म्हटले आहे की, रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य अत्यंत मोठे असून त्यांची निःस्वार्थ सेवा समाजासाठी प्रेरणादायी आहे. दोन पिढ्यांना त्यांनी धार्मिक प्रेरणा दिली असून समाजात नैतिक मूल्यांची जपणूक त्यांच्या कार्यामुळे शक्य झाली आहे.
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींनी समाजकल्याणासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. अपघातग्रस्तांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करून आज ५३ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. अपघात झालेल्या जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवून त्यांचे जीव वाचवले जातात. त्यांनी सुरू केलेल्या देहदान आणि अवयवदान उपक्रमामुळे अनेकांना नवजीवन मिळाले आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात आणि शासकीय रुग्णालयांना लाखावर बाटल्या रक्त पुरवले जाते. तसेच “ब्लड इन नीड” या उपक्रमाद्वारे गरजूंना तातडीने रक्त मिळते.
नाणीज येथे १२ वीपर्यंत मोफत इंग्रजी माध्यमाची शाळा, वेदपाठशाळा, अन्नदान, व्यसनमुक्ती उपक्रम, दुर्बल घटकांना मदत आणि हिंदू धर्म पुनर्प्रवेश यासारख्या कार्यातून त्यांनी समाजावर सकारात्मक परिणाम घडवला आहे. महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नतीसाठी केलेले हे योगदान अनन्यसाधारण असल्याचे नितेश राणे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
“आयुष्यभराची साधना, समाजसेवा आणि संस्कृती जपण्यासाठी त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देणे हे राज्यासाठी गौरवाचे ठरेल,” अशा शब्दांत राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या ; मंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
